लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आयएनएस तलवार’ या भारतीय युद्धनौकेने तांत्रिक साहाय्यता पुरवत दोन दिवसांपासून समुद्रात बंद पडलेले व्यापारी जहाज सुरू करून दिले. त्यामुळे दोन दिवसांपासून समुद्रात भरकटणारे ‘नयन’ हे व्यापारी जहाज आणि त्यावरील सात भारतीय खलाशांची सुखरूप सुटका झाली आणि ते पुन्हा मार्गस्थ झाले.
ओमानहून इराकच्या दिशेने जाणाऱ्या ‘नयन’ या व्यापारी जहाजावरील विद्युतनिर्मिती संच, नॅव्हिगेशन यंत्रणा आणि जहाजाला पुढे ढकलणारी ‘प्रॉपल्शन’ यंत्रणा ९ मार्चला ठप्प झाली. त्यामुळे हे व्यापारी जहाज समुद्रात भरकटले. व्यापारी जहाजावरून सातत्याने तांत्रिक साहाय्यतेचे संदेश पाठविले जात होते. ११ मार्चला ओमानच्या खाडीत गस्तीवर असलेल्या ‘आयएनएस तलवार’ या युद्धनौकेने हा संदेश पकडत तपास आणि बचाव मोहीम हाती घेतली. सुरुवातीच्या हवाई पाहणीनंतर नौदलाचे जवान आणि तंत्रज्ञांचे पथक व्यापारी जहाजावर दाखल झाले. तब्बल सात तासांच्या अथक परिश्रमांनंतर व्यापारी जहाजावरील तांत्रिक बिघाड दूर करण्यात नौदलाच्या पथकाला यश आले. व्यापारी जहाजावरील दोन्ही जनरेटर्स, मुख्य इंजिनातील बिघाड दूर करण्यात आले. त्यानंतर व्यापारी जहाज पुढील प्रवासासाठी बंदराकडे रवाना होऊ शकले.