लोन ॲपच्या जाळ्यात व्यापारी; ‘हॅप्पी वॉलेट’ ॲपकडून व्यापाऱ्याचे मॉर्फ फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 07:08 AM2022-05-29T07:08:48+5:302022-05-29T07:08:55+5:30
पीडित हे कपड्याचे व्यापारी असून, त्यांनी गेल्या सात ते आठ महिन्यात हॅप्पी वॉलेट ॲपकडून बऱ्याचदा चार ते पाच हजारांचे कर्ज घेतले होते.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : इन्स्टंट लोन ॲपच्या जाळ्यात फसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी एक व्यापारी ‘हॅप्पी वॉलेट’ या ॲपचा बळी ठरल्याचे उघड झाले. अवघ्या अडीच हजार रुपयांच्या कर्जापायी या व्यापाऱ्याची संबंधित ॲपकडून नाहक बदनामी सुरू असल्याचे समोर आले आहे. या ॲपकडून व्यापाऱ्याचा एका महिलेसोबत अश्लील अवस्थेत मॉर्फ केलेला फोटो व्हायरल करण्यात आला. याबाबत समजल्यानंतर व्यापाऱ्याने कस्तुरबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत व्यापाऱ्याचे समुपदेशनही केले.
पीडित हे कपड्याचे व्यापारी असून, त्यांनी गेल्या सात ते आठ महिन्यात हॅप्पी वॉलेट ॲपकडून बऱ्याचदा चार ते पाच हजारांचे कर्ज घेतले होते. ते त्यांनी परतही केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी या व्यापाऱ्याचा मोबाईल हरवला. त्यामुळे त्या दरम्यान त्यांचा नंबर बंद होता. गेल्या आठवड्यात त्यांच्या एका मित्राचा त्यांना फोन आला. या मित्राने एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत त्यांचे अश्लील फोटो व्हायरल झाल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी नवीन फोन घेत बंद सीम सुरू केले. त्यावेळी त्यांना लोन वसुली एजंटकडून शिवीगाळ करीत अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीचे मेसेज मिळाले. हे मॅसेजेस पाहून त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार त्यांना सांगितला. मात्र, याविरोधात तक्रार दाखल करण्यास ते तयार नव्हते.
साहेब, मला तक्रार नाही करायची !
‘आम्ही पीडिताला समुपदेशन देत तक्रार दाखल करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे अखेर ते तयार झाले व आम्ही जबाब नोंदवीत याप्रकरणी गुन्हा दाखल केला’, अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली. तक्रार दाखल केल्याने अशा गुन्हेगारांचा शोध आम्हाला घेता येतो, असेही त्यांनी नमूद केले.