मुंबई : आॅक्टोबर हिटमुळे मुंबई सध्या चांगलीच तापली आहे. त्यात आरोग्य सांभाळण्यासाठी मुंबईकरांना ‘थंड’ राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमान ३६ अंशांवर आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. उकाडा वाढायला सुरुवात झाल्यावर सामान्यपणे थंड पेय, आईस्क्रीम खाण्याकडे अनेकांचा कल असतो. थंड पदार्थ खाल्यामुळे थंड वाटते, हा समज चुकीचा आहे. या पदार्थांमुळे थंड वाटत असले तरी प्रत्यक्षात असे घडत नाही. त्यामुळे या पदार्थांचा शरीराला त्रास होतो. हे टाळण्यासाठी आॅक्टोबर हिटपासून मुंबईकरांनी जपून राहिले पाहिजे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तापमानाचा पारा चढत गेल्यावर शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे त्रास अधिक होतो. शरीरातील पाणी कमी झाल्यावर थकवा जाणवणे, घशाला कोरड पडणे असे त्रास जाणवू लागतात. अनेकांचे शरीराचे तापमान वाढल्याचे त्यांना वाटू लागते. हे टाळण्यासाठी मुंबईकरांनी थंड राहण्याची आवश्यकता आहे. यासाठी उन्हाच्या वेळी बाहेर पडण्याचे टाळावे. सुती कपडे घालावेत. पाण्यात सब्जा भिजवून ठेवून खाल्ल्यास शरीरात थंडावा राहातो, असे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले. सीनियर फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी सांगितले, आॅक्टोबर हिटमुळे उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. शरीरातील पाणी कमी होऊ नये, म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायले पाहिजे. पाण्यात इलेक्ट्रॉल पावडर घालावी. यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि एनर्जी टिकून राहते. थंड पेय पिण्यापेक्षा ताक प्यावे. रस्त्यावरील लिंबू सरबत पिणे टाळावे. घरचे लिंबू सरबत घ्यावे. या कालावधीत लिक्विडचे अधिक सेवन केल्यास शरीराचे तापमान वाढत नाही. आणि त्यामुळे उकाड्याचा त्रास जाणवत नाही.
पारा चढतोय, मुंबईकरांनो सांभाळा
By admin | Published: October 19, 2015 1:40 AM