बुध ग्रहाचे कोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:01 AM2018-05-06T05:01:29+5:302018-05-06T05:01:29+5:30
बुधाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत असल्यामुळे, तो नेहमी सूर्याच्या दिशेनेच दिसतो. हा ग्रह रात्रभर कधीच दिसत नाही. पृथ्वीवरून बघताना सूर्य आणि बुधातील कोनीय अंतर २८ अंशांपेक्षा जास्त कधीच नसते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी किंवा नंतर आपल्याला जास्तीतजास्त दोन तास आधी किंवा नंतर दिसू शकतो.
- अरविंद परांजपे
बुधाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत असल्यामुळे, तो नेहमी सूर्याच्या दिशेनेच दिसतो. हा ग्रह रात्रभर कधीच दिसत नाही. पृथ्वीवरून बघताना सूर्य आणि बुधातील कोनीय अंतर २८ अंशांपेक्षा जास्त कधीच नसते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी किंवा नंतर आपल्याला जास्तीतजास्त दोन तास आधी किंवा नंतर दिसू शकतो.
जे खूप जास्त उत्तर किंवा दक्षिण अक्षांशावर असतात, त्यांना बुधाचे दर्शन जरा अवघड असते. असे म्हणतात की, कोपर्निकसने विश्वाच्या केंद्राला पृथ्वीपासून हलवून सूर्यावर ठेवले. त्याला कधीच या बुधाचे दर्शन झाले नव्हते, पण विषुववृत्ताजवळ असणाऱ्या लोकांना मात्र तो सहज दिसू शकतो. सौरमालेतील या सर्वात लहान ग्रहाचा व्यास सुमारे ४,८८० किमी आहे. याचा सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा काळ ८८ दिवस असतो. आपल्यापासून खूप दूर असल्यामुळे, याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण पृथ्वीवरून खूप अवघड आहे, पण जेव्हा बुधावर कृत्रिम उपग्रहांनी भेट दिली, तेव्हा त्याचा पृष्ठभाग अगदी चंद्रासारखा असल्याचे दिसून आले. चंद्रासारखेच याच्या पृष्ठभागावर अनेक विवरे आहेत. याचा अर्थ असा की, या ग्रहावर वातावरण नाही. त्यामुळे याच्या तापमानातील बदल खूप जास्त प्रमाणात होतात. याच्या पृष्ठभागाचे तापमान १७३ ते ४२७ अंश सेल्शियस इतक्या मोठ्या प्रमाणात बदलत असते, पण बुधाचा अक्ष त्याच्या कक्षेला जवळ जवळ लंब आहे. त्यामुळे बुधाच्या ध्रुवीय भागांवर काही ठिकाणी तापमानात फार बदल होत नाही.
खगोलशास्त्राच्या इतिहासाच्या टप्प्यात एक काळ असाही येऊन गेला की, शास्त्रज्ञांना वाटले, सूर्य आणि बुध यांच्यामध्ये एक ग्रह असायला हवा. त्यांनी त्या ग्रहाला नाव दिले होते व्हल्कन. असे वाटण्यामागचे कारण म्हणजे, बुधाच्या परिभ्रमणाचे गणित अचूक सुटत नव्हते आणि असा अंदाज बांधण्यात आला होता की, कदाचित बुध आणि सूर्य यांच्यामध्ये एखादा ग्रह असावा की, ज्याच्या गुरुत्वीय बलामुळे बुधाची कक्षा बदलत असावी. अनेकांनी हा ग्रह शोधण्याचा खूप प्रयत्न केला. काहींनी तर आपल्याला तो सापडला आहे, असा दावाही केला.
बुधाच्या कक्षेच्या आतील ग्रहाचा शोध तर अवघडच, पण सूर्याच्या इतका जवळ ग्रह म्हटल्यावर स्वाभाविक तो आपल्या आणि सूर्याच्या मध्ये येतच असणार. याला आपण त्या ग्रहाचे सूर्यबिंबावर अधिक्रमण असे म्हणतो. अनेक निरीक्षकांनी अधिक्रमणाच्या निरीक्षणांची नोंद केल्याचे सांगितले, पण निरीक्षणांच्या आधारे पुढच्या अधिक्रमणांची भाकिते मात्र फोल ठरली. इतकेच काय की, खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र सूर्याला संपूर्ण झाकतो, त्या वेळीसुद्धा या ग्रहाचा शोध घेण्यात आला. असा हा ग्रह मात्र कधीच सापडला नाही. पुढे आइन्स्टाइनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतामुळे या बुधाच्या गतीचे कोडे सुटले. अंतराळात पाठविण्यात आलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या निरीक्षणांच्या आधारे खात्रीपूर्वक सांगू शकतो की, सूर्य आणि बुध यांच्यात ५.७ किलोमीटर व्यासाच्या जास्त असा कुठला पदार्थ नाही.
(लेखक नेहरू तारांगणचे
संचालक आहेत.)
आपण आता सौरमालेतील सदस्यांची माहिती करून घेऊ या. सुरुवात सौरमालेतील सूर्याच्या सर्वात जवळच्या ग्रहापासून म्हणजेच बुधापासून करू या.
गोफण फिरविणाºया शेतकºयाचे दृष्य डोळ्यासमोर आणा. त्याची दोरी जरी त्याच्याभोवती गोल फिरत असली, तरी लांबून पाहताना त्या दोरीचे टोक त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला ठरावीक अंतरापर्यंत जाऊन पर येताना दिसते, तसेच काहीसे बुधाचे आहे.
बुधाच्या संदर्भात अनके प्रश्न अनुत्तरित आहेत. बुधाची घनता ५.४३ ग्रॅम प्रती घन सेंटिमीटर आहे. पृथ्वीची घनता ५.५२ ग्रॅम प्रती घन सेंटिमीटर आहे, पण तुलनेत हा चंद्रासारखा जास्त आहे. मग याची घनता जास्त का? सौरमालेतील लहान अवशेषांच्या वर्षावात याच्यावरची कमी घनतेची धूळ-माती बाहेर फेकली गेली होती का? तसेच बुधावर चुंबकीय क्षेत्र आहे, पण त्याचबरोबर त्याच्या पृष्ठभागावर लोखंड मात्र सापडत नाही. असे का? तर बुध आपल्या सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा एक वेगळ्या प्रकारचा ग्रह आहे? अशी अनेक कोडी आहेत.