Join us

पारा चढाच; पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उष्णतेचा पारा चढतच असून, विदर्भाच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उष्णतेचा पारा चढतच असून, विदर्भाच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली असून, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासात राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले असले तरी १२ आणि १३ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तर कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान विदर्भात नोंदविण्यात येत आहे. चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान ३८ अंशाच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमान ३६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, मुंबईत ते ३२ अंश आहे.

............................