ढगाळ हवामानात मुंबईच्या पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:06 AM2021-01-04T04:06:32+5:302021-01-04T04:06:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईतल्या प्रदूषणात वाढ नोंदविण्यात आली. हे कमी म्हणून काय, शनिवारी मुंबईत हवामान ...

Mercury rose in Mumbai in cloudy weather | ढगाळ हवामानात मुंबईच्या पारा चढला

ढगाळ हवामानात मुंबईच्या पारा चढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईतल्या प्रदूषणात वाढ नोंदविण्यात आली. हे कमी म्हणून काय, शनिवारी मुंबईत हवामान ढगाळ नोंदविण्यात आले. सलग होत असलेल्या बदलामुळे वातावरण गढूळ झाले असून, याचा परिणाम म्हणून मुंबईच्या किमान तापमानाचा पारा चढला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी मुंबईत किमान तापमान १५ अंश इतके नोंद झाले. माथेरानपेक्षाही मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना थंडीचा हंगाम अनुभवता आला. मात्र, वर्ष सरत असताना येथील हवा प्रदूषित नोंदविण्यात आली. शिवाय शनिवारी हवामानही ढगाळ नोंदविण्यात आले. त्यामुळे किमान तापमानाचा पारा चढला. शनिवारी किमान तापमान २० अंश नोंद झाले, पण कमाल तापमान स्थिर राहिले. रविवारी किमान तापमानाची नोंद १९ अंश झाली. शनिवारच्या तुलनेत रविवारी किमान तापमान खाली उतरले असले, तरी हवामानात बदल झाल्याने म्हणावी तशी थंडी पडली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी २४ तास स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

राज्याचा विचार करता, राज्यात बहुतांश भागात किमान तापमान खाली आहे. माथेरान, नाशिक, मालेगाव, जळगाव, बारामती, पुणे, सांगली, महाबळेश्वर, सातारा, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या शहरांचे किमान तापमान १८ अंशाच्या खाली नोंदविण्यात येत आहे. एकंदर मुंबईच्या किमान तापमानाचा पारा चढला असला, तरी राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान स्थिर आहे. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत राज्यातील शहरे थंडीचा अनुभव घेत आहेत.

Web Title: Mercury rose in Mumbai in cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.