तीन दिवसांत पारा जाणार ४० पार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 06:19 AM2024-04-14T06:19:10+5:302024-04-14T06:20:04+5:30
रायगडमधील काही परिसरात कमाल तापमान ३९ ते ४० अंशांच्या आसपास नोंदविण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह राज्यभरातील कमाल
तापमानाच्या पाऱ्यात चढउतार नोंदविले जात असतानाच बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान ३७ अंशांवर असून, पुढील तीन दिवस मुंबई महानगर प्रदेश अर्थात ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील काही परिसरात कमाल तापमान ३९ ते ४० अंशांच्या आसपास नोंदविण्याची शक्यता आहे.
४५ अंश: सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा तीन अंश सेल्सिअसने तापमान अधिक असेल किंवा सलग दोन दिवस ४५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असेल, तर उष्णतेची लाट, असे संबोधले जाते. ३७ अंश: ३७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा त्रास होत नाही.
उष्मा शोषला जातो
३७ अंशांनंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते. त्याचे विपरित परिणाम मानवी शरीरावर होतात. तापमान आणि आर्दता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. प्रत्यक्ष तापमान ३४ अंश सेल्सिअस असेल; पण आर्दता ७५ टक्के असेल तर तापमान निर्देशांक ४९ अंश सेल्सिअस इतका असतो. म्हणजे व्यक्तीला ते तापमान ४९ अंश सेल्सिअस इतके त्रासदायक ठरते.