मुंबई :
राज्यातील बहुतांश शहरांना अवकाळी पावसाचा सातत्याने फटका बसत असून, यात वादळी वारे आणखी भर घालत आहेत. पुढील २४ तासांसाठी हवामान खात्याने पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबईच्या कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून, कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात येत आहे. त्यात भर म्हणून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुंबईत पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यात वादळी वारे, गारपिटीचा समावेश आहे. हवामानातील हे बदल असेच कायम राहणार असून, आता बुधवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे, तर मुंबईत आता कमाल तापमानात वाढ होणार असून, हे कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. गुरुवारसह शुक्रवारी मुंबईत पावसाची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली.
मुंबईसह कोकणातील जिल्ह्यात बुधवारी, तर विदर्भातील जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी वातावरणापासून सुटका मिळू शकते. त्यानंतरच्या २-३ दिवसांत म्हणजे १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरण जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी