Join us

सुरक्षा महामंडळ होमगार्डमध्ये विलीन करा, पांडेंनी दिलेला अडीच महिन्यापूर्वी प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:48 AM

महिन्याला १०० कोटी वसुलीच्या टार्गेटच्या गृहमंत्र्यांवरील कथित आरोपावरून राज्य सरकार अद्याप सावरले नसताना, ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा सरकारचे कोट्यवधी रुपये वाचविण्याचा प्रस्ताव आता चर्चेत आला आहे.

- जमीर काझी  मुंबई : महिन्याला १०० कोटी वसुलीच्या टार्गेटच्या गृहमंत्र्यांवरील कथित आरोपावरून राज्य सरकार अद्याप सावरले नसताना, ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा सरकारचे कोट्यवधी रुपये वाचविण्याचा प्रस्ताव आता चर्चेत आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे होमगार्डमध्ये विलीनीकरण केल्यास वर्षाला किमान नऊ कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी सरकारकडे दिलेल्या प्रस्तावात केला आहे.  स्फोटक कार व सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारने १७ मार्चला मुंबईचे आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. त्यांना होमगार्डला पाठवून तेथील संजय पांडये यांची सुरक्षा महामंडळात बदली केली. त्यामुळे नाराज परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय वाझेला महिन्याला शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा ‘लेटरबॉम्ब’ फोडून सरकारला अडचणीत आणले; तर पांडे हे ‘सरकार सेवाज्येष्ठता डावलत असल्या’चा जाहीर आरोप करीत रजेवर गेले. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा बदलीच्या रॅकेटचा कथित अहवाल उघड करून सनसनाटी निर्माण केली. आघाडी सरकार या संक्रमण काळातून जात असताना गृह विभागातील पूर्वीच्या अनेक महत्त्वाच्या बाबी व पत्रव्यवहार समोर येत आहे.  पांडे हे होमगार्डचे महासमादेशक व सुरक्षा महामंडळाचा अतिरिक्त कार्यभार पाहत असताना त्यांनी १२ जानेवारीला तत्कालीन गृहसचिव सीताराम कुंटे यांना पाठविलेल्या प्रस्तावाची प्रत ‘लोकमत’ला मिळाली आहे. महामंडळाचे सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षण केंद्र आणि पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद येथे प्रशासकीय कार्यालये उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत. मात्र होमगार्डची जिल्हास्तरावर ट्रेनिंग सेंटर व कार्यालये आहेत. दोन्ही संस्थांचे काम एकच असल्याने त्यांचे एकत्रीकरण केल्यास हा खर्च टळणार आहे. तसेच महामंडळाची दरवर्षी वेतन, प्रशिक्षण व मुख्य कार्यालयाच्या भाड्यापोटी होणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होणार असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. विलीनीकरणामुळे होणारी बचत सुरक्षा महामंडळाचे होमगार्डमध्ये विलीनीकरण केल्यास दरवर्षी वेतनावरील सहा कोटी, प्रशिक्षण व नोंदणी साठीचे एक कोटी व वर्ल्ड ट्रेंड सेंटरमधील ३२व्या मजल्यावरील मुख्यालयाचे १.७५ कोटी वाचणार आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई