सांताक्लॉजच्या पोतडीत स्वच्छतेचा संदेश
By admin | Published: December 25, 2016 04:24 AM2016-12-25T04:24:18+5:302016-12-25T04:24:18+5:30
देवाचा दूत मानला जाणारा सांताक्लॉज नाताळात प्रेमाचा संदेश घेऊन भेटवस्तू वाटण्यासाठी येतो, असे म्हणतात. या सांताक्लॉजची बच्चेकंपनी आवर्जून वाट पाहत असते.
मुंबई : देवाचा दूत मानला जाणारा सांताक्लॉज नाताळात प्रेमाचा संदेश घेऊन भेटवस्तू वाटण्यासाठी येतो, असे म्हणतात. या सांताक्लॉजची बच्चेकंपनी आवर्जून वाट पाहत असते. मात्र या वेळेस हा सांताक्लॉज स्वच्छतेचा संदेश घेऊन येणार आहे. ‘स्वच्छ मुंबई अभियाना’ची जनजागृती करण्यासाठी हा अनोखा प्रयोग मुंबईत सुरू आहे. मात्र एरव्ही दंडाचा बडगा उगारणारे क्लीनअप मार्शल्स सांताक्लॉजच्या भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा संदेशही चॉकलेट व फुले देऊन गांधीगिरीच्या मार्गाने देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी एफ दक्षिण विभागातील कर्मचारी सांताक्लॉज बनून स्वच्छतेचा संदेश देत फिरत होते. हा प्रयोग प्रभावी ठरल्यामुळे महापालिकेने आता संपूर्ण मुंबईतच सांताक्लॉजना फिरविण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी क्लीनअप मार्शल्सची निवड करण्यात आली. परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांना क्लीनअप मार्शल्स दंड करीत असतात. परंतु कधी दमदाटी करून तर कधी ‘सेटिंग’ करून नागरिकांकडून मार्शल्स पैसे उकळतात, असा आरोप होतो.
हा आरोप खोडून काढण्यासाठी व स्वच्छतेचा संदेश मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्याकरिता मार्शल्सना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यानुसार शनिवारी हे सांताक्लॉज काही विभागांमध्ये फिरताना दिसले. उद्या शहरभर हे सांताक्लॉज नाताळ सणानिमित्त फिरून स्वच्छतेचा संदेश देताना दिसतील.
एखादा नागरिक कचरा टाकताना दिसल्यास त्याला फुले व चॉकलेट देऊन स्वच्छतेची समज गांधीगिरीने देण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत होते. (प्रतिनिधी)