Join us

‘ति’चे वाळूशिल्प देते मुंबईकरांना संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:06 AM

‘प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे’ ही म्हण सर्वश्रुत असली तरी वाळूला कलेचे माध्यम म्हणून स्वीकारून त्यात ओळख निर्माण करणे ही अशक्य गोष्ट आहे.

शेफाली परब-पंडित मुंबई : ‘प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे’ ही म्हण सर्वश्रुत असली तरी वाळूला कलेचे माध्यम म्हणून स्वीकारून त्यात ओळख निर्माण करणे ही अशक्य गोष्ट आहे. बेताच्या परिस्थितीतही वाळूशिल्पांचा छंद जोपासणाऱ्या लक्ष्मी गौड यांच्या कर्तृत्वाची गाथा आजच्या महिलांना एक वेगळा दृष्टिकोन देऊन जात आहे. या सर्वसामान्य गृहिणीने संसाराचा गाडा हाकण्यासाठी पतीच्या बरोबरीने वडापावची गाडी चालविताना वाळूशिल्प कलेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नि:स्वार्थी भावनेने कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा न करता आपल्या या कलेच्या माध्यमातून त्या समाजप्रबोधनही करीत आहेत.वाळूशिल्पकार वडील मारुती कांबळे यांच्या हाताखाली तयार झालेल्या लक्ष्मी यांनी त्यांच्या निधनानंतर वाळूशिल्पाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. जेमतेम आठवीपर्यंतचे शिक्षण आणि हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्यापुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या. ‘इच्छा तिथे शक्ती’ या म्हणीप्रमाणे या अडचणींवर त्यांनी आपल्या जिद्दीने मात केली. त्यांच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले. जुहू चौपाटीवरील वडापावच्या स्टॉलवर दिवसभर जमलेल्या गल्ल्यातून त्यांचे पती नौरत्म गौड त्यांना थोडी रक्कम वाळूशिल्प साकारण्यासाठी देतात. तर कधी एखादी मैत्रीण रंगांसाठी आर्थिक मदत करते. त्यांचा मुलगा एखादी कल्पना देऊन जातो. त्यातूनच चौपाटीवर वाळूशिल्प साकार होते.(लक्ष्मी गौड, व्यवसाय; वडापावची गाडी)