मुंबई : आजच्या संगणक, मोबाइलच्या डिजिटल युगात मैदानी खेळ काहीसे मागे पडत चालले आहेत. याच खेळांचे महत्त्व पटवून देत त्याच्या जनजागृतीसाठी विलेपार्ले येथील दोन मित्रांनी पुढाकार घेतला आणि मुंबई-पुणे असा सायकल प्रवास दहा तासांत पूर्ण करून या प्रवासात मैदानी खेळ खेळण्याचा संदेश दिला.राजस खांडेकर (१४) आणि अर्णव तेलंग (१६) अशी या मुलांची नावे आहेत. पार्लेश्वर मंदिर (विलेपार्ले, मुंबई) ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (पुणे) असा सायकल प्रवास त्यांनी नुकताच पूर्ण केला आहे. १५८ किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान ‘मुलांनी मैदानी खेळात सहभाग घेतला पाहिजे’ असा संदेश त्यांनी दिला.राजस खांडेकर हा पार्ले टिळक विद्यालयाचा (आयसीएसई) विद्यार्थी आहे. तर अर्णव तेलंग हा पोद्दार महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांची घट्ट मैत्री आहे. त्यांनी सांगितले की, आजकालच्या मुलांमध्ये क्रिकेटवगळता मैदानी खेळांचे आकर्षण कमी झाले आहे. त्यामुळेच मुलांना या खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दोघांनी सायकलचा प्रवास करण्याचा निर्धार केला. सायकलिंग करणे हे कष्टाचे असल्यामुळे सहसा कोणी याकडे वळत नाही. त्यासाठी निर्धार लागतो. आम्ही यापूर्वी पार्ला ते गेट वे आॅफ इंडिया, ठाणे, कर्जत, दहिसर असा सायकल प्रवास केला आहे. मुंबई-पुणे प्रवासात काही अडचणी आल्या, घाटरस्ता पार करणे काहीसे कठीण झाले. मात्र सर्व अडथळ्यांवर मात करत आणि मैदानी खेळांबाबत जनजागृती करत हा प्रवास दहा तासांत पूर्ण केला, असेही त्यांनी सांगितले. राजसचे वडील अनिल खांडेकर यांनी सांगितले की, ‘काही दिवसांपासून लांबचा पल्ला गाठायचा असा विचार होता. अखेर पुण्याला सायकलवरून जाण्याचा बेत आखला.
सायकल प्रवासातून मैदानी खेळ खेळण्याचा संदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 1:28 AM