रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा संदेश; वनमंत्र्यांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 02:37 AM2019-06-02T02:37:08+5:302019-06-02T02:37:30+5:30
हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात.
मुंबई : दुष्काळ दूर झाला पाहिजे असे सगळेच बोलतात, त्यासाठी झाडे लावली पाहिजेत, असेही सांगतात. मात्र, दहिसर येथील रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा अनोखा संदेश दिला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही तर ‘वृक्षीणा’ आहे, असे सांगत माने यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
माने यांनी आपली रिक्षा अनोख्या पद्धतीने सजविली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, वेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते, तेव्हा लोक बघत राहतात. रिक्षात बसणारे प्रवासी म्हणतात, आम्हाला रिक्षात नाही, तर उद्यानात बसल्यासारखे वाटते. मनाला खूप प्रसन्नता वाटते, आनंद मिळतो. लोकांच्या या प्रतिक्रिया ऐकून भरून येते, असेही ते म्हणाले.
माने यांना आईसह पत्नी आणि तीन मुले आहेत. केतकीपाडा, दहिसर येथील आदिवासी पाड्यात ते राहतात. लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नलला थांबलो की लोक रिक्षाजवळ येऊन ‘सेल्फी’ काढतात. गाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने ‘खूप सुंदर’ असे सांगतात. रिक्षात बसणारे लोक झाडासाठी म्हणजे रोपांसाठी पैसेही देतात व आमच्या नावाने रिक्षात एक रोप लावा असे सांगतात, असेही माने उत्साहाने सांगत होते.
प्रकाश माने, वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत
पोटापाण्यासाठी लोक विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय करतात. पण हे करीत असताना सामाजिक भान जपून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे, हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात. माने यांच्यासारखी माणसे या मोहिमेचा आधार असून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचे खरे शिल्पकार आहेत. - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
प्रकाश माने रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा संदेश देत आहेत. त्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.