आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 08:52 PM2019-08-15T20:52:00+5:302019-08-15T20:53:43+5:30
शिवसेनेने सुद्धा आरेतील 2238 झाडे कापण्यास विरोध दर्शविला आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: आरेत मेट्रो प्रकल्प 3 च्या कार शेड उभारण्याच्या नावाखाली येथील 2238 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यामुळे आरेतील पर्यावरणाचे आणि वन्यप्राणी व पक्षांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवसेनेने सुद्धा आरेतील 2238 झाडे कापण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आरेच्या पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणाऱ्या खास डिझाइनच्या छत्र्या वॉचडॉग फाऊंडेशनने तयार करून घेतल्या. या छत्रांमध्ये पर्यावरण विषयावर 8 वेगवेगळ्या पक्ष्यांचा संदेश देणाऱ्या 25 पहिल्या प्रकारच्या छत्र्या असून आरेच्या जंगलाचा व झाडांचा ऱ्हास करू नका असा संदेश देणाऱ्या 25 छत्र्या तयार करून घेतल्या.
आरेच्या पर्यावरणविषयक समस्येवर प्रकाश टाकणा-या विषयावर खास डिझाइन केलेल्या 10 छत्र्या आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नूतन पवार तसेच 40 छत्र्या या आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना सादर करून त्यांचा अनोखा सत्कार केला. वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा व गॉडफ्रे पिमेटा यांनी याबाबत सांगितले.
पक्षी व झाडे बोलू शकत नाही, त्यामुळे आम्हाला वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा असा अनोखा संदेश या एकूण 50 छत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आरे पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल विशाल पाटील यांचा 75 वर्षांचा जेष्ठ नागरिकांचा जीव वाचविण्याच्या निर्भीड कृत्याबद्दल आणि त्यांच्या शौर्यासाठी पुष्पगुच्छ आणि कौतुकाचे प्रमाणपत्र सादर केले. यावेळी छोटा काश्मीर तलाव ते आरे पोलिस ठाण्यापर्यंत वॉचडॉग फाऊंडेशच्या सदस्यांनी रॅली काढली होती. तत्पूर्वी त्यांनी आरेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सदर 40 छत्र्या व निवेदन दिले अशी माहिती शेवटी निकोलस अल्मेडा व गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली.