‘मेस्टा’चा राज्यभरात शाळा सुरू करण्याचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:08 AM2021-09-24T04:08:09+5:302021-09-24T04:08:09+5:30
शिक्षण विभागाची परवानगी नसताना २७ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याची घोषणा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शाळा सुरू करण्यासाठी ...
शिक्षण विभागाची परवानगी नसताना २७ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन (मेस्टा) आमने-सामने उभे राहिले आहेत. राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात एकीकडे शिक्षणमंत्री सावध भूमिका घेत असताना दुसरीकडे मेस्टाने मात्र राज्याच्या काही जिल्ह्यांत शाळा सुरू करण्याचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना शाळा सुरू करण्यासाठी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलून यासाठीचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले. तर शिक्षणमंत्र्यांना आव्हान देत मेस्टाने मात्र आपल्याकडे असलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या १८ हजार शाळा या २७ सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. शिवाय या शाळा सुरू करण्यासाठी आपण कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळत आणि त्यासाठीची पालकांची संमती घेतली जाणार असल्याचे मेस्टाने स्पष्ट केले आहे.
राज्यात मागील दीड वर्षापासून ग्रामीण भागातील आणि विशेषत: उपेक्षित घटकांतील मुले ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीच्या शिक्षणापासून वंचित आहेत. आम्ही अनेकदा ऑनलाइन शिक्षणासाठी धोरण जाहीर करण्याची मागणी केलेली असतानाही त्याकडे शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आता शाळा सुरू करण्यासाठी आम्ही ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे अशा गावांतील पालकांची संमती घेण्याची मोहीम सुरू केली आहे, असे मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी सांगितले. तसेच शालेय शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात मेस्टाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.