गुरांना रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर धातूंचे अडथळे,वंदे भारतच्या अपघातांना बसणार आळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:17 AM2023-01-30T08:17:24+5:302023-01-30T08:17:49+5:30
Railway: मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरस्टार एक्स्प्रेसला सतत गुरांची धडक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरस्टार एक्स्प्रेसला सतत गुरांची धडक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने मुंबई-अहमदाबाद सेक्शनवर धातूंचे अडथळे बांधण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई सेंट्रल -गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसची सतत गुरांची धडक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असून, रेल्वे गाडी रेल्वे रुळावरून घसरण्यासह रेल्वे अपघातांची शक्यता वाढते. यामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात येते आणि यामुळे रेल्वे वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. भविष्यात गुरांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने गुरांच्या अडथळ्यांना कुंपण बांधण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुमारे ६२२ किमी लांबीचे धातूंचे कुंपण बांधले जाणार असून त्याला अंदाजे २४५. २६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या सर्व ८ निविदा मंजूर झाल्या असून काम जोरात सुरू आहे. हे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.