मुंबई : रविवार, १२ आॅगस्टच्या रात्री ययाती (पर्सिड्स) तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव चंद्रप्रकाशाचा अडथळा नसल्याने अधिक प्रेक्षणीय दिसेल. आकाश निरभ्र असल्यास तासाला साठ ते सत्तर उल्का पडताना दिसू शकतील, असे खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले, १२ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर तीन वाजता (सोमवारी १३ आॅगस्ट रोजी पहाटे) ईशान्य म्हणजे पूर्व-उत्तर क्षितिजावर ययाती तारकासंघातून उल्कावर्षाव दिसेल. या दिवशी पृथ्वी ही स्विफ्ट टटल धूमकेतूच्या मार्गातून जाईल. सुमारे १३३ वर्षांनी सूर्याला प्रदक्षिणा घालणारा स्विफ्ट टटल हा धूमकेतू याआधी ११ डिसेंबर १९९२ रोजी सूर्यापाशी आला होता. त्यामुळे ताशी दोनशे ते पाचशे उल्का पडताना दिसल्या होत्या.स्विफ्ट टटल धूमकेतूचे वैशिष्ट्य म्हणजे तो पृथ्वीच्या अति जवळून जातो. २१२६ मध्ये तो पृथ्वीपासून २ कोटी २० लक्ष किलोमीटर अंतरावरून जाईल. ३०४४ मध्ये तो पृथ्वीपासून फक्त दहा लक्ष किलोमीटर अंतरावरून जाईल. तर १५ सप्टेंबर ४४७९ रोजी पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
उद्या रात्री उल्कावर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 5:49 AM