हवामान खात्याने नीट अंदाज दिला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:59 AM2020-08-07T05:59:57+5:302020-08-07T06:00:43+5:30
विजय वडेट्टीवार; मुंबई सहा तासात पूर्वपदावर
मुंबई : हवामान खात्याने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, एकाच दिवसात ३३० मिमी पाऊस पडेल याची कल्पना नव्हती. पावसाबाबतचा हा अंदाज चुकला. मात्र, सर्व यंत्रणा सतर्क असल्यामुळे सहा ते आठ तासात मुंबई पूर्व पदावर आली, असा दावा मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी केला.
मुंबईसह राज्यात मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, घरातही पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले की, हवामान खात्याने अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता. साधारण १७५ मिमी पाऊस पडेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात ३३० मिमीपर्यंत पाऊस झाला. काल पावसासोबत जोराचे वारेही वाहत होते. तरीही यंत्रणा पूर्णपणे सतर्क होत्या. रात्री उशिरापर्यंत मी स्वत: आणि वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन होतो. परिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पाऊस वाढल्यावर पुण्याहून आणखी तुकड्या मागविण्यात आल्या. या तुकड्या तातडीने दाखल झाल्या आणि रात्रीच त्यांनी काम हाती घेतले. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही अवघ्या सहा ते आठ तासात मुंबई पूर्व पदावर आली, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.