मुंबई : उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, गेले तीन दिवस जळगावात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारीही जळगाव येथे ४५.८ अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमानही ३८ ते ४२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
कुठे किती पारा
मुंबई ३५.२
जळगाव ४५.८
जालना ४३
परभणी ४३.६
नांदेड ४२.८
बीड ४२.६
सोलापूर ४१.४
धाराशिव ४१.१
पुणे ४०.८
सातारा ४०.४
बारामती ४०.२
नाशिक ३९.७
सांगली ३८.१
माथेरान ३६.८
नागपूरचा पारा ४२ अंशावर!
तापमानाने अद्यापतरी तापमानाची सरासरी गाठली नसली तरी उन्हाच्या झळांनी नागरिकांचा त्रास वाढला आहे. शुक्रवारी अकाेल्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. नागपूरचाही पारा हळूहळू वाढत ४२ अंशावर पाेहचला आहे. अद्याप सरासरीपेक्षा कमी असला तरी उन्हाचे चटके वाढले आहेत.
बंगालच्या खाडीत तयार झालेले माेखा चक्रीवादळ आता म्यानमार आणि बांगलादेशकडे वळले असून रात्रभरात ते अधिक धाेकादायक ठरणार असण्याची शक्यता आहे. १४ मे पर्यंत त्याची सक्रियता कायम राहणार आहे. मात्र सध्यातरी मध्य भारत आणि आसापास चक्रीवादळाचा प्रभाव नाही. तापमान मात्र संथगतीने वाढत आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस तापमान वाढीचा अंदाज दिला आहे. वर्धा येथे पारा ४३.४ अंशावर गेला आहे तर नागपूरसह गाेंदिया, अमरावती, यवतमाळमध्ये ४२ अंशावर पाेहचले आहे. नेहमी तापदायक असलेल्या चंद्रपूरला मात्र अद्याप पारा चढलेला नाही.