मुंबई : मुंबईसह राज्याला देण्यात आलेला पावसाचा इशारा गुरुवारीही कायम राहणार आहे. विशेषत: कोकणात पावसाचा धुमाकूळ कायम राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना देण्यात आलेला ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. तर सोबत पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांनाही ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत राज्यात मान्सून सक्रिय आहे. दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणावर पावसाचे ढग आहेत. या भागांत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. बुधवारी सकाळपासून रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घ्यावी. हवामानाचे अलर्ट देणाऱ्या वेगरिज ऑफ दी वेदर या संस्थेचे प्रमुख राजेश कपाडिया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतल्या पावसाचा जोर गुरुवारी सकाळी आणि दुपारी कायम राहील. गुरुवारी सायंकाळी मात्र पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल.