#MeTooमुळे माझ्या करिअरचे नुकसान झाले- साजिद खान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:42 AM2018-11-02T04:42:22+5:302018-11-02T06:49:36+5:30
अभिनेत्री सलोनी चोप्रा, प्रियंका बोस आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक छळप्रकरणी गंभीर आरोप केले.
मुंबई : मीटू मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या आरोपांमुळे माझ्या करिअरचे नुकसान झाले आहे, असे दिग्दर्शक साजिद खानने यासंदर्भात भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेने पाठविलेल्या नोटिसीला उत्तर देताना स्पष्ट केले.
अभिनेत्री सलोनी चोप्रा, प्रियंका बोस आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक छळप्रकरणी गंभीर आरोप केले. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यावेळी वेळ आल्यावर खरे काय ते लोकांसमोर येईल, पण मी निर्दोष आहे, असे साजिदने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या प्रकरणात साजिदची बहीण फराह खान हिनेदेखील त्याची बाजू न घेण्याचे ठरवले होते. तर त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय अक्षय कुमार आणि अनेक कलाकारांनी घेतला. साजिदवर असलेले गंभीर आरोप पाहता भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेने त्याला नोटीस पाठवली होती. तिला अखेर साजिदने उत्तर दिले.
आरोपांमुळे माझ्या करिअरचे नुकसान झाले आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बहीण आणि आईलाही यामुळे अतोनात दु:ख झाले आहे. माझ्यावर झालेले आरोप मला मान्य नाहीत. एकच बाजू ऐकून त्यावर कोणतेही मत तयार करू नका, अशी मी तुम्हाला विनंती करतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे साहाय्य करायला मी तयार आहे, असे उत्तर साजिदने संघटनेला दिले आहे.
दरम्यान, साजिदविरुद्ध दिग्दर्शक संघटनेकडे चार तक्रारी आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी दिली. साजिद खान ‘हाउसफुल्ल ४’चे दिग्दर्शन करणार होता. मात्र महिलांनी केलेल्या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारत या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याने याआधीच घेतला आहे.