मुंबई : महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या ‘मी-टू’ मोहिमेच्या वणव्यात बॉलीवूडवर अक्षरश: होरपळून निघत आहे. अनेक नामांकितांचे मुखवटे उतरल्याने त्यांचे खरे चेहरे उघडे पडले आहेत.अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाने अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि दिग्दर्शक राकेश सारंग अडचणीत आले. या सर्वांवर आता गुन्हाही दाखल झाला आहे. चरित्र अभिनेते आलोक नाथ यांच्यावर तर अनेक महिलांनी छळाचा आरोप केल्याने टी.व्ही. मालिकांच्या छोट्या पडद्याआड दडलेला काळोख या निमित्ताने उजेडात आला. रजत कपूर, वरुण ग्रोव्हर, लेखक सुहेल सेठ, संगीतकार अनु मलिक, दिग्दर्शक सुभाष कपूर आणि गायक कैलास खेर हे नामांकित चेहरे आरोपीच्या पिंजºयात आले आहेत. आमिर खानने ‘मी-टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शवत ‘मुघल’ चित्रपटातून अंग काढून घेतले. त्याने आणि पत्नी किरण रावने याबाबतची आपली भूमिका सोशल मीडियातून जाहीर केली आणि स्त्रिया व्यक्त करत असलेल्या भावनांना आपला पाठिंबा जाहीर केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे. गितीका त्यागीने कपूर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. आमिरच्या निर्णयाचा मी आदर करतो. मी निर्दोष आहे आणि न्यायालयात मी ते नक्कीच सिद्ध करेल, असे सुभाष कपूर यांनी म्हटले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ‘मी-टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाºया दोषींना शिक्षा मिळायलाच हवी. कामाच्या ठिकाणी महिलांशी गैरवर्तन, त्यांचा अनादर अक्षम्य आहे, असे अमिताभ यांनी म्हटले आहे. याऊलट ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र ‘मी-टू’ मोहिम ही निव्वळ प्रसिद्धीसाठी असून ती गंभीरपणे घेण्याचे कारण नाही, असे सांगत या मोहिमेच्या शिडातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.गायिका सोना मोहपात्रा हिने आज अनु मलिक यांनाही कैलाश खेरच्या रांगेत उभे केले. कैलाश खेर सारख्या अनेक प्रवृत्ती इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे अनु मलिक, असे सोनाने म्हटले आहे. अनु मलिक यांनी मात्र मी सोनाला कधी भेटलोच नाही, असे सांगून आरोप धुडकावून लावले आहेत. लैंगिक गैरवर्तन आणि शोषणाचे आरोप झेलणा-यांच्या यादीत लेखक सुहेल सेठ आणि प्रसिद्ध मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांचेही नाव चढले. सुहेल सेठ यांच्याविरोधात गैरतर्वनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी एक आरोप एका अल्पवयीन मुलीने केला आहे.मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही एका महिलेने गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. मुंबईच्या सुखनिध कौर असे या महिलेचे ना आहे. मी १४ वर्षांची असताना भट्ट यांनी आमच्या शाळेत परफॉर्मन्स केला होता. यावेळी मोहन भट्ट यांनी आपल्यासोबत छेडछाड केली होती, असे या महिलेने म्हटले आहे.अनील कपूरला या विषयावर छेडल्यावर थेट कोणाविरूद्ध भूमिका न घेता त्याने माझ्या घरात तीन महिला आहेत, मी त्यांचा आदर करतो असे सांगितले. सलमान खानवर बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप झाल्यावर अभिषेक बच्चनने मात्र वेगळीच भूमिका घेत सलमान हा फिल्म इंडस्ट्रीतला चांगला कलाकार असल्याचे प्रमाणपत्र दिले. दिग्दर्शक सुभाष घई यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत विचारता त्यांनी सध्या अशा आरोपांची फॅशन आल्याची टीका करत आरोप फेटाळून लावले.काँग्रेस पक्ष घेणार व्यापक भूमिका‘मी-टू’ या मोहिमेअंतर्गत काँग्रेस पक्ष लवकरच व्यापक भूमिका घेईल, असे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी गुरूवारी दिल्लीत जाहीर केले. राफेलसंदर्भात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी ए. जे. अकबर यांच्या मंत्रिपदाबाबतप्रश्न विचारल्यावर राहुल यांनी लवकरच याबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन व्यापक भूमिका जाहीर केली जाईल, असे सांगितले. देशातील स्त्रियांच्या दृष्टीने हा अत्यंत मोठा आणि गंभीर विषय आहे; काँग्रेस पक्ष याबाबत संवेदनशील आहे, असे मतही त्यांनी मांडले.
#MeToo वादळाने अनेकांचे मुखवटे उतरले; दिग्दर्शक सुभाष कपूर आरोपीच्या पिंजऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 3:40 AM