#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 08:16 PM2018-10-12T20:16:04+5:302018-10-12T20:46:56+5:30
महिलांकडून गंभीर आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम न करण्याचा अक्षय कुमारचा निर्णय
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्तानं गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नाना पाटेकर हाऊसफुल्ल 4 चित्रपटातून बाहेर पडले आहेत. महिलांकडून गैरवर्तनाचे आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम करणार नसल्याचं अक्षय कुमारनं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. हाऊसफुल्ल 4 मध्ये अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अक्षय कुमारच्या या निर्णयानंतर नाना पाटेकर चित्रपटातून बाहेर पडले असल्याची माहिती समोर येत आहे.
नाना पाटेकर यांनी हाऊसफुल्ल 4 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. तनुश्री दत्तानं केलेल्या आरोपानंतर पाटेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. हाऊसफुल्ल 4 चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवरही अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणांची दखल घेत चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारनं आज दुपारी एक महत्त्वपूर्ण ट्विट केलं. चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवरील आरोपांची चौकशी होईपर्यंत चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याची विनंती आपण निर्मात्यांनी केल्याचं अक्षयनं ट्विटमध्ये म्हटलं होतं.
— Akshay Kumar (@akshaykumar) October 12, 2018
अक्षय कुमारच्या ट्विटनंतर दिग्दर्शक साजिद खाननं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानं या निर्णयाची माहिती ट्विटरवर दिली. 'माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आणि माझं कुटुंब, हाऊसफुल्ल 4 चे निर्माते आणि कलाकार यांच्यावर आलेल्या दबावामुळे मी चित्रपटातून बाहेर पडत आहे. या प्रकरणातील सत्य समोर येईलच,' असं साजिदनं ट्विटमध्ये म्हटलं होतं.