विद्युत राेषणाई, फुलांच्या सजावटीत आकुर्ली स्थानकात झाली मेट्राेची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:28+5:302021-06-01T04:06:28+5:30
ओमकार गावंड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या दोन ...
ओमकार गावंड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या दोन मेट्रो मार्गांच्या चाचणीला अखेर सोमवारी दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गावरील चाचणीची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागून राहिली होती. यामुळे रविवारी रात्रीपासूनच मेट्रो ७ मार्गावरील आकुर्ली स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासून आकुर्ली मेट्रो स्थानकाच्या आत व बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण मेट्रो स्थानकाला फुलांनी सजविण्यात आले होते. स्थानकाची सजावट, तसेच स्थानकाजवळ असणारा बंदोबस्त यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बघ्यांची काही प्रमाणात गर्दी जमली होती. यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. ११ वाजेच्या सुमारास सोमवारच्या चाचणीसाठी चालविण्यात येणारी चालकविरहित मेट्रो आकुर्ली स्थानकावर दाखल झाली. यावेळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्याने जणू काही मेट्रोच्या स्वागतासाठी स्वतः वरुणराजाच बरसू लागल्याचे जाणवत होते. ही मेट्रो स्थानकात दाखल होण्याच्या वेळी आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना, तसेच रस्त्यावरील इतर नागरिकांना मेट्रोला आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून कैद करण्याचा मोह आवरला नाही.
यानंतर ठीक १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आकुर्ली मेट्रो स्थानकात दाखल झाले. ते प्लॅटफॉर्मवर येताच तुतारीच्या निनादात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी त्यांनी मान्यवरांसह मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविला व मेट्रो हॉर्न वाजवीत थेट दहिसरच्या दिशेने रवाना झाली. मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्याच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. मात्र, मेट्रो स्थानकातून पुढे निघून जाताच तातडीने प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी झाली.
या कार्यक्रमाच्या वेळी आकुर्ली स्थानकाच्या खाली भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
फोटो ओळ - मेट्रो चाचणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सजावट केलेल्या आकुर्ली स्थानकावर पोलिसांनादेखील फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी पोलीस आपल्या कर्मचारी मित्रांसोबत फोटो व सेल्फी काढत होते.
-------------------------------------------------