सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो १ विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:21 AM2024-07-05T08:21:37+5:302024-07-05T08:22:50+5:30
परिणामी प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यात विलंब झाला. याबाबत समाज माध्यमांतून मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली.
मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरील गाडीत बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळीही मेट्रो सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो गाडीत बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मेट्रो १ मार्गिकेवरील एका गाडीतील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाला होता. ही बाब लक्षात येताच मेट्रो प्रशासनाने ही गाडी सेवेतून बाहेर काढली. परिणामी गाडीला काही काळ विलंब झाला. दरम्यान ऐन सकाळी कार्यालयात जाण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने स्थानकांवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यात विलंब झाला. याबाबत समाज माध्यमांतून मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली.
सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो १ मार्गिकेवरील गाडीत बिघाड झाल्याचा प्रकार घडला आहे. ऐन सकाळच्या सुमारास मेट्रो गाडीत बिघाड का होतो, असा प्रश्नही प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, एक मेट्रो गाडी सेवेतून काढण्यात आल्याचे मेट्रो १ प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच पुढील काही वेळात सेवा सुरळीत केल्याचे नमूद करण्यात आले.