मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या वर्षीच्या शेवटी मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या दोन्ही मार्गिका सुरू करणार असल्याचे जाहीर केले असून, त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यावर या मार्गिकांवर प्रवासासाठी किती तिकीट दर असतील याचीही घोषणा गुरुवारी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली आहे. त्यानुसार या मार्गिकांसाठी कमीत कमी १० रुपये तिकीट दर असणार असून, मेट्रो-१च्या तुलनेत मेट्रो-७, मेट्रो-२ मार्गिकांवर तिकीट दर निम्मे असणार आहेत, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.सध्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-१ मार्गिकेवर ११.४० किमीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ४० रुपयांचा खर्च येतो. मात्र राज्य सरकारच्या अधिपत्याखाली बनलेल्या मेट्रो २ ए आणि मेट्रो-७ या दोन्ही मार्गिकांवर १२ किमीचा प्रवास करण्यासाठी केवळ २० रुपयांचे तिकीट आकारण्यात येणार आहे. म्हणजेच मेट्रो-१ मार्गिकेच्या तुलनेमध्ये निम्मे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. आर. ए. राजीव यांच्यानुसार सार्वजनिक परिवहनाचा उद्देश हा फायदा कमवण्याचा नसून चांगली सेवा प्रवाशांना देण्याचा आहे. प्रत्येक मुंबईकरांना मेट्रो प्रवास करता यावा, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे भाडे निश्चित केले असल्याचे राजीव यावेळी म्हणाले.मेट्रोचे वेळेवर काम पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्व कंत्राटदारांची बैठक घेऊन काम वेळेमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजीव यांनी मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ मार्गिकेच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला होता. यादरम्यान आवश्यक आणखी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्राधिकरणाने सप्टेंबर २०२०पर्यंत मेट्रोची चाचणी करून यावर्षीच दोन्ही मेट्रो मार्गिका सुरू ठेवण्याची तयारी केली आहे. मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या दोन्ही मार्गिकांचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहे.तसेच २०१९मध्ये १३९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांचे काम सुरू करण्यात आले होते, यावर्षी यामध्ये ४१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांची भर पडली असून आता या वर्षी १८० किमी लांबीच्या मार्गिकांचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यासह यावेळी एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांबाबत माहितीही देण्यात आली.>असे असणार मेट्रोचे दर!दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर मेट्रो-२ ए ही मार्गिका १८.६० किमी लांबीची आहे, तर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ ही दुसरी मार्गिका १६.५० किमी लांबीची आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर या मार्गांवर तीन किमीपर्यंत दहा रुपये, ३ ते १२ किमीपर्यंत २० रुपये आणि १२ ते १८ किमीपर्यंत ३० रुपये असे दर असणार आहेत. तर इतर प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो मार्गिकांवरही असेच दर असणार असून, त्यापुढील म्हणजेच १८ ते २४ किमीपर्यंत ४० रुपये, २४ ते ३० किमीपर्यंत ५० रुपये, ३० ते ३६ किमीपर्यंत ६० रुपये, ३६ ते ४२ किमीपर्यंत ७० रुपये आणि ४२ किमीपेक्षा जास्त ८० रुपयांपर्यंत तिकीट दर आकारण्यात येणार आहेत, असेही एमएमआरडीएतर्फे यावेळी जाहीर करण्यात आले.
मेट्रो-७, मेट्रो-२चे तिकीट मेट्रो-१च्या तुलनेत असणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:44 AM