मुंबई : वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील मेट्रो-१ मुंबईकरांच्या सेवेत कार्यान्वित झाली असली तरी त्यापुढच्या टप्पा असलेल्या मेट्रो-२ रेल्वेसाठी मुंबईकरांना आणखी अनिश्चित काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा ३१ कि.मी. अंतराचा नियोजित प्रकल्प काही वर्षे तरी केवळ कागदावरच रेंगाळण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाने त्यासाठी घातलेल्या अटी अद्याप कायम असल्याने तूर्तास तरी त्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही झाली नसल्याची कबुली दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. मेट्रो-२ प्रकल्पाच्या मार्गावर सीआरझेड-२ आणि ३ मधील काही भाग येत असल्याने पर्यावरण विभागाने त्याला ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे. त्यामुळे त्यातील काही अटी शिथिल करण्यास केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी मिळण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी पर्यावरणमंत्र्यांकडे केली आहे, त्याचप्रमाणे हा प्रस्ताव मंजूर न झाल्यास या प्रकल्पातील काही भाग भुयारी मार्गाने बनविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (प्रतिनिधी)
मेट्रो-२ प्रकल्प आणखी रेंगाळणार
By admin | Published: June 17, 2014 2:02 AM