Join us

मेट्रो २ अ ओव्हरहेड वायरिंगचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:07 AM

मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार चाचणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू असून, ...

मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू असून, आता या कामाचा एक भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोच्या २ अ च्या ओव्हरहेड वायरिंगचे कामही हाती घेण्यात आले आहे. हे काम वेगाने सुरू असून, या दोन्ही मार्गांवरील मेट्रोच्या चाचण्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत रुजू हाेणार असून, या दोन्ही मेट्रोंमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येईल. मेट्रो लाईन २ अ आणि लाइन ७ हे दोन्ही मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण आहेत; कारण यामुळे अंधेरी आणि दहिसरदरम्यान मेट्रो प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून, त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित केले आहे. मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल. ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मेपासून मेट्रो मार्गाचे व्यावसायिक कामकाज सुरू होईल.

-----------------

- दहिसर पूर्व ते डीएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रोच्या बांधकामासाठी ६ हजार ४१० कोटी रुपये खर्च होत आहे.

- आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एक्सर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीरनगर, कामराजनगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूरनगर, गोरेगाव मेट्रो, आदर्शनगर, शास्त्रीनगर आणि डीएननगर अशी १६ स्थानके यात आहेत.

-----------------

- अंधेरी (पूर्व) आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६ कि.मी. लांबीची मेट्रो ६ हजार २०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे.

- दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके यात आहेत.

-----------------

- चालकविरहित ट्रेनशी अनुकूलता

- ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टिम

- प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेनलेस स्टील बॉडी

- विकसित देशातील शहरांप्रमाणे या नवीन कोचमधून प्रवाशांना त्यांच्या सायकलसह प्रवास करता येऊ शकेल.

......................