मेट्रो - २ असाठी एमएमआरडीएचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मेट्रो- २ अ च्या फलाटांचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले जाईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला. याव्यतिरिक्त ४ स्थानकांच्या रुफ पोर्टलचे काम पूर्ण झाल्याचा दावाही प्राधिकरणाने केला असून, यात आनंदनगर, शिंपोली, आयसी कॉलनी आणि एक्सर या स्थानकांचा समावेश आहे.
महावीरनगर, डॉन बॉस्को येथील काम १० डिसेंबरपर्यंत होईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. तर ऋषी संकुल येथील कामही सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. मेट्रो- २ अ मार्गावरील मेट्रो रेल्वेची ट्रायल जानेवारी महिन्यात सुरू हाेईल. मेट्रो रेल्वे कोच येत्या काही दिवसांत चारकोप डेपोत दाखल होईल. मे २०२१ मध्ये मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू हाेईल.
मेट्रो- २ अ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता काम वेगाने सुरू आहे. मेट्रो सुरू झाल्यावर दोन मेट्रोंमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोंमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल, असे प्राधिकरणाने सांगितले.
-----------------
मार्ग : मेट्रो-२ अ - दहिसर ते डी.एन. नगर
किमी : १८.५८९ किमी
मार्ग : उन्नत
स्थानके : १७
तिकिट दर : १०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे
फायदा : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे, मेट्रो लाइन १, मेट्रो लाइन २ ब आणि अंधेरी ते दहिसर यांच्यात संपर्क होईल. मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई जोडली जाईल. प्रवासाची वेळ ५० टक्के वाचेल.