मेट्रो - २ अ सुसाट : ५८.८६ टन वजनाचे स्टील गर्डर उभारण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबई इन मिनिट्सचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. पश्चिम उपनगरातल्या मेट्रो-२ अ वर ५८.८६ टन वजनाचा एक स्टील गर्डर उभारण्यात आला असून, उर्वरित कामेदेखील वेगाने सुरू असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता कोरोनामुळे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक घटकांची वाहतूक जपानमधून येण्यापासून अडकल्याने मेट्रोच्या कामांनाही फटका बसत आहे. मात्र आवश्यक मेट्रोचे घटक येताच मेट्रो चाचणीसाठी तयार होणार आहे. मेट्रो सुरू करतानाच दोन मेट्रोंमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोंमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल.
मेट्रोमध्ये सुरुवातीला ड्रायव्हरची मदत घेतली जाईल. मात्र मेट्रो ही ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी आहे. भविष्यात ड्रायव्हरची गरज भासणार नाही. दरम्यान, मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पांसह कार्यरत असलेल्या प्रकल्पांचे सुरळीत संचालन करा, असे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी यापूर्वीच दिले आहेत.
---------------------------------
मार्ग : मेट्रो-२ अ - दहिसर ते डी.एन. नगर
किमी : १८.५८९ किमी
मार्ग : उन्नत
स्थानके : १७
तिकिट दर : १०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे
फायदा : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे, मेट्रो लाइन १, मेट्रो लाइन २ ब आणि अंधेरी ते दहिसर यांच्यात संपर्क होईल. मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई जोडली जाईल. प्रवासाची वेळ ५० टक्के वाचेल.