मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू असून, आजघडीला ५४ किमी पैकी ५०.३ किलोमीटरचे भुयारीकरण पूर्ण झाल्याचा दावा कॉर्पोरेशनने केला असून हे प्रमाण टक्क्यात ९३ आहे.
विशेषत: मेट्रो - ३ च्या २, ४, ५, ६ आणि ७ या पॅकेजमधील भुयारीकरण १०० टक्के झाले असून, सीप्झपासून सायन्स म्युझियमपर्यंतचे भुयार पूर्ण झाले आहे, अशी माहिती देखील कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. यात सीएसएमटी, दादर, धारावी, बीकेसी, विमानतळ आणि एमआयडीसी अशा महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
दरम्यान, नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सहार रोड ते राष्ट्रीय विमानतळ स्थानक हा १.५ किलोमीटर लांबीचा ३६ वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-१ आणि तापी-२ या दोन टनेल बोअरिंग मशिन्सच्या मदतीने पॅकेज ६ ने एकूण ४.४ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले.