- जमीर काझी, मुंबई आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या नियोजित कार डेपोला होत असलेल्या विरोधापुढे राज्य शासन सपशेल माघार घेण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले आहे. याबाबत नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील भूखंडावर कार डेपो बनविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे जोगेश्वरी-विक्रोळी आणि पूर्व महामार्गाच्या मध्यावर असलेल्या या ठिकाणाहून कुलाबा-वांद्रे सीप्झ ही मेट्रो धावण्याची चिन्हे आहेत.समितीने बुधवारी नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे विभागातील सूत्रांनी सांगितले. सुमारे ३३.५ किलोमीटर लांबीच्या पूर्णपणे भूमिगत मेट्रो-३चे कार डेपो गोरेगावातील आरे कॉलनीत निश्चित करण्यात आले होते. मात्र त्याला पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात याबाबत तज्ज्ञांची अभ्यास समिती नेमली होती.समितीच्या सूचनेनुसार ठिकाण कांजूरमार्ग येथे निश्चित केल्यास मेट्रो-३ च्या नियोजित अंतरामध्ये सहा किलोमीटर अंतर वाढणार आहे. त्यासाठी आय.आय.टी. पवईपर्यंत स्वतंत्र एक स्थानकही बनविले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च १ हजार ८०० कोटी रुपयांवरून २ हजार कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी जपानमधील जपान आंतरराष्ट्रीय को-आॅपरेशन एजन्सी (जेआयसीआय) या कंपनीने अर्थसाहाय्य केले आहे. त्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.सीप्झ ते कांजूरमार्ग मुंबई मेट्रोच्या प्राथमिक नियोजनानुसार सीप्झ ते कांजूरमार्ग हा मेट्रोचा सहावा मार्ग करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे त्याबाबतच्या विस्तारित मार्गाची निविदा मागविण्याच्या प्रक्रियेला आणखी काही काळ लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे करार केले जातील, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मेट्रो-३चा कार डेपो कांजूरमार्गला?
By admin | Published: August 13, 2015 3:05 AM