मुंबई: झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेलं मेट्रो-३ चं कारशेड अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मेट्रोचं कारशेड आरेमधून रॉयल पाममध्ये हलवण्यात येणार आहे. आरेमध्ये झाडं तोडून उभारलं जाणारं कारशेड वादग्रस्त ठरलं. या कारशेडला शिवसेनेनं विरोध केला होता. आता हे कारशेड आरेपासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्याची तयारी असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. मात्र रॉयल पामची जागा खासगी विकासकाची आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध खासगी विकासकाच्या फायद्यासाठी होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरेतल्या कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामनं काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. कारशेडसाठी रॉयल पामचा विचार करण्यात यावा, असं रॉयल पामकडून पत्रात नमूद करण्यात आलं होतं. असंच एक पत्र रॉयल पामनं वनशक्ती या आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेलादेखील पाठवलं होतं. रॉयल पाम प्रायव्हेट लिमिटेडच्या महाव्यवस्थापकांनी कारशेडसाठी ३० ते ६० एकर जागा देण्याचं औदार्य दाखवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.भाजपासोबत सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या प्रकरणी त्यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीनं कारशेडसाठी कांजूरमार्गचा विचार केला. मात्र त्यामुळे खर्चात कोट्यवधींची वाढ होणार असल्यानं हा पर्याय मागे पडला.रॉयल पाममध्ये मेट्रोचं कारशेड हलवण्याच्या हालचालींवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केली. खासगी विकसकाकडून अशा प्रकारे जागा घेतल्यास काही एफएसआय द्यावा लागतो. हा अतिरिक्त एफएसआय देण्यासाठी शिवसेनेनं आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध केला होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:24 AM
मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता; भाजपाची शिवसेनेवर जोरदार टीका
ठळक मुद्देमेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पाममध्ये हलवण्याच्या हालचालीरॉयल पाम आरे जंगलापासून १ किलोमीटर अंतरावरखासगी विकासकाला फायदा पोहोचवण्यासाठी कारशेड हलवलं जात असल्याचा भाजपाचा आरोप