Join us

मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 7:25 AM

३३४०५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाचा खर्च आता १० हजार २६९ कोटी रुपयांनी वाढला आहे. आधी २३ हजार १३६ कोटी रुपये खर्चाच्या असलेल्या या  प्रकल्पाच्या ३३ हजार ४०५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचा वाढता खर्च लक्षात घेता आता या वाढीव खर्चात केंद्र सरकारनेही वाटा उचलावा यासाठी नवीन सरकार पाठपुरावा करणार आहे. 

सुधारित आराखड्यानुसार राज्य सरकारच्या या  प्रकल्पातील हिश्श्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी रुपयांवरून ३ हजार ६९९ कोटी रुपये एवढी झाली आहे. त्यामुळे आता राज्याच्या समभागापोटी  एक हजार २९७ कोटी रुपये एवढी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आले आहेत.  मुंबई मेट्रो मार्ग ३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. 

कर्जाचा भार वाढला ६६८९ कोटींनी

सुधारित वित्तीय आराखड्यानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी रुपये इतके झाले असून वाढीव रकमेचे कर्ज घेण्यास देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कर्ज आता ६६८९ कोटी रुपयांनी वाढले आहे. 

टॅग्स :मेट्रोएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार