मुंबई : मुंबईकरांना उत्सुकता लागून राहिलेल्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने पुढे जात असून, या प्रकल्पाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भुयाराच्या मजबुतीकरिता आवश्यक असणाऱ्या टनल रिंगच्या निर्माण कामाचा श्रीगणेशा मंगळवारी वडाळा येथील कास्टिंग यार्ड येथे करण्यात आला आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भुयारीकरणाकरिता लागणाऱ्या टनल बोरिंग मशिन्स जुलै २०१७पर्यंत मुंबईत येतील, अशी आशा आहे. प्रत्यक्ष भुयारीकरण आॅक्टोबर २०१७ मध्ये नियोजित आहे. हा पल्ला गाठण्यासाठी टनल सेगमेंट रिंग तयार करणे आवश्यक आहे. या रिंगमुळे भुयारीकरणाला मजबुती येते. या प्रकल्पाकरिता ४० हजार रिंग्जची आवश्यकता भासणार आहे. रिंग्जच्या निर्मितीकरिता एकूण ६५ साच्यांची आवश्यकता आहे. हे साचे फ्रान्स आणि कोरिया येथून आयात केले जाणार आहेत. तर काही दिल्ली मेट्रोकडून मागविण्यात येणार आहे. प्रत्येक साच्यात सहा रिंग्ज तयार होणे शक्य आहे. आजचा दिवस प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, आम्ही टनल सेगमेंट रिग्ज या नियोजित वेळेआधी तयार करण्यास सुरुवात केली आहे.- एस.के. गुप्ता, प्रकल्प संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमुंबईसारख्या शहरात भुयारीकरण करणे हे आव्हानात्मक काम आहे. हे काम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेर मुंबईत मोठ्या प्रमाणावर भुयारीकरणाचे काम सुरू होणार आहे. या कामाचा मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
मेट्रो-३ : टनेल रिंगच्या कामाचा श्रीगणेशा
By admin | Published: March 08, 2017 4:44 AM