लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद आणि वेगवान व्हावा, यासाठी ‘एमएमआरडीए’मार्फत मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. यापैकी कुलाबा ते सिप्झदरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो ३’चे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाचे ऑक्टोबरअखेरपर्यंत ८६.२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे उद्दिष्ट आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ चे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेची इतर काही कामे सुरू आहेत.
या मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मेट्रो प्रशासनाने ठरविले आहे, तर या मार्गावर मेट्रोची रात्रीच्या वेळेस ट्रायल रन देखील घेण्यात येत आहे.कुलाबा ते सिप्झदरम्यान धावणाऱ्या मेट्रो ३ चे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेडदरम्यान करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे काम ९० टक्क्यांहून अधिक, तर दुसऱ्या टप्प्यातील काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.
प्रकल्पासाठी २३,१३६ कोटी खर्च हाेणार
पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२३, तर दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी २३,१३६ कोटी खर्च केले जाणार आहेत.
भुयारी मार्गिका अंतिम टप्प्यातकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या पहिल्या वहिल्या भुयारी मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून, या मार्गिकेतील आरे ते बीकेसी या टप्प्यातील बीकेसी, विद्यानागरी, सिप्झ या मेट्रो स्थानकांची, तर आरे डेपोची अधिकाऱ्यांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. तसेच पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असणारी शेवटची नववी मेट्रो गाडी मुंबईत दाखल झाली. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील एका कारखान्यात मेट्रो ३ च्या गाड्यांची बांधणी करण्यात आली आहे. या सर्व नऊ गाड्या मुंबईतील आरे कारशेडमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.