Join us

मेट्रो-३ चे रुळ मुंबईत दाखल; रुळांचे आणखी २ संच वर्षाअखेर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 8:09 PM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मार्गावर धावणा-या मेट्रोचे रुळ आता मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मार्गावर धावणा-या मेट्रोचे रुळ आता मुंबईत दाखल झाले आहेत. मितसुई कंपनीने पाठवलेला हा रुळांचा संच जपानमधील यावाटा येथून ४ आठवडयाच्या कालावधीत सागरी मार्गाने मुंबईत आणण्यात आला. अचूक तापमान नियंत्रण, मजबुती ही वैशिष्टये असलेली ३ हजार ६१५ मेट्रीक टन वजन असलेल्या हेड  हार्डन प्रकारच्या रुळ यंत्रणेचे आगमन हे मुंबई मेट्रो ३ च्या पूर्णत्वाच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील यावाटा येथून ही रूळ यंत्रणा उच्च प्रतीची आणि अत्यल्प कंपने देणारी हाय एटीन्यूएशन लो व्हायब्रेशन पद्धतीची आहे. भारतात ही यंत्रणा प्रथमच वापरण्यात येत आहे . मेट्रो धावत असताना कमीत कमी कंपने आणि ध्वनी  निर्माण करणे ही देखील या यंत्रणेची वैशिष्टय आहेत. मुंबईतील प्राचीन वास्तु यांना इजा पोहचणार नाही या दृष्टीनेही ही यंत्रणा उपयुक्त आहे. शासनाने  कोविडसंबंधी नेमून दिलेल्या नियमावलीनुसार हा रुळांचा संच मुंबई  बंदरातून बीकेसी येथील एमएमआरसीच्या यार्डात काही दिवसातच सुरक्षितपणे पोहोचेल. दरम्यान, उर्वरित ७१२५ मेट्रीक टन वजनाचे रूळ दोन संचांमध्ये यंदा वर्ष अखेरीस मुंबईत दाखल होतील ................................ 

यंत्रणा इतर सामान्य यंत्रणांच्या तुलनेत २० ते २२ व्हीडीबी इतकी कंपन गति कमी करणारी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. जलद आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देणा-या मेट्रो ३ च्या बांधकाम पूर्णत्वाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी 

...............................

  • रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो.
  • ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे मधील गर्दी कमी करू शकतो.
  • मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल.
  • मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणे शक्य होईल.
  • प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध होतील.
  • संपूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गावर २७ स्थानके असतील.
  • पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील.
  • भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.
  • प्रवासी मेट्रो ट्रॅकवर जाऊ नयेत म्हणून विशेष सूचना देण्याचा प्रयत्न असणार आहे.
  • मेट्रो स्थानकांवर स्वयंचलित प्रवास भाडे यंत्र बसविण्यात येणार आहे.
टॅग्स :मेट्रोमुंबई