मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाला गिरगाव आणि काळबादेवी येथील रहिवाशांनी विरोध दर्शविला असतानाच आता माहीमकरांनीही मेट्रोविरोधात नाराजीचा सूर लगावला आहे. माहीम येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे लगतच्या परिसरातील बांधकामांना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही लिहिले असून, यावर तोडगा काढण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.माटुंगा-माहीम येथील रहिवासी असलेले गिरीश राऊत यांनी सांगितले की, भुयारी रेल्वेचा मार्ग व स्थानके सुमारे ९० ते १२० फूट म्हणजे ९ ते १२ मजले खोलवर असणार आहेत. वीज गेल्यास किंवा इतर अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. मुंबईत गाड्या थांबल्यास स्टेशनांवर काही मिनिटांत हजारो माणसांची गर्दी उसळते. मुंबईच्या भूगर्भातील वाळू व इतर थर खचू शकतात. काही दुर्घटना घडल्यास इतक्या खोलीवरून वेगाने बाहेर पडणे शहराच्या धकाधकीने थकलेल्या मुंबईकरांना शक्य नाही. हजारो माणसे बळी पडतील. याच्या वातानुकूलनामुळे बाहेर मुंबईत तापमान वाढणार आहे. प्रकल्पाचा खर्च आताच २३ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात तो ५० हजार कोटींपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज अलीकडेच संबंधितांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मेट्रोचे किमान तिकीट शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल. या प्रकल्पाला सार्वजनिक वाहतूक प्रकल्प म्हणता येणार नाही. यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.चर्चगेट, कुलाबा, गिरगाव, मरोळ, सिद्धार्थ महाविद्यालय, जे. एन. पेटीट आणि गोरेगाव येथे मेट्रो-३विरोधात आंदोलने छेडण्यात आली असतानाच आता माहीम येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मेट्रो-३ : माहिमकरही नाराज, कामामुळे परिसरातील बांधकामांना हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 3:00 AM