मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाºया जनहित याचिकेवर उत्तर देताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो मुंबईची गरज असल्याचे म्हटले आहे. मुंबईत उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. ही सेवा अपुरी असल्याने जलदगतीने मेट्रो-३ प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे, असे एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.उपनगरीय लोकल व बस सेवेवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ शकते. याला रोखण्यासाठी मेट्रो-३ ची आवश्यकता आहे. घाईगर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढण्यासाठीही जागा नसते. मुंबईची लोकल सेवा दिलासा मिळावा म्हणून विनवणी करत आहे. मात्र, याला खूप विलंब झाला आहे. संकट केव्हाही येईल. मुंबईला मेट्रो-३ ची किती आवश्यकता आहे, हे तपासूनच कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली, असे एमएमआरसीच्या उपमहाव्यवस्थापकांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.मेट्रो-३ चे काम रात्रंदिवस सुरू असल्याने कुलाब्याच्या एका रहिवाशाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, मेट्रोचे कामकाज रात्रीही सुरू असल्याने रहिवाशांना झोपही घेता येत नाही. मेट्रो ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन करत आहे.आॅगस्ट महिन्यात उच्च न्यायालयाने मेट्रो-३ च्या प्रकल्पाचे काम रात्री करण्यास मनाई केली. मात्र, एमएमआरसीएलने ही स्थगिती हटविण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.मेट्रोचे काम जेवढा काळ रखडेल तेवढा जास्त पैसा सरकारच्या तिजोरीतून जाईल. तसेच प्रकल्पही रखडेल,’ असे म्हणत एमएमआरीएलने मेट्रो-३ च्या प्रकल्पावरील स्थगिती हटविण्याची विनंती न्यायालयाला केली.दरम्यान, मेट्रो-३ च्या भुयारी कामामुळे फोर्ट परिसरात जागतिक वारसा असलेल्या इमारतींना तडे बसत असल्याबाबतही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मेट्रो-३ मुंबईची गरज; एमएमआरसीएलचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:40 AM