मेट्रो ३ प्रकल्प : आवाज कमी करण्यास ध्वनी प्रतिबंधक उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 07:07 AM2018-05-11T07:07:00+5:302018-05-11T07:07:00+5:30
ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी मेट्रो ३ मार्गासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सखोल माहितीही देण्यात आली.
मुंबई - ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी मेट्रो ३ मार्गासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सखोल माहितीही देण्यात आली.
कफ परेड व विधान भवन स्थानकांच्या बांधकामाच्या ठिकाणी ध्वनी प्रतिबंधक लावल्याचे तसेच पायलिंगदरम्यान होणाºया आवाजास प्रतिबंध लावण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजनेविषयीदेखील माहिती देण्यात आली. बांधकाम ठिकाणांची परिस्थिती लक्षात घेता जेथे-जेथे शक्य होईल तेथे तेथे अतिरिक्त ध्वनी प्रतिबंधक उपाययोजना अवलंबिल्या जाणार असल्याचेही या वेळी प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.
पायलिंगच्या कामाने अधिक प्रमाणात ध्वनी निर्माण होतो. मात्र हे काम डिसेंबर २०१८ अखेरीस पूर्ण होणार आहे. तसेच या कालावधीत स्थानकाचे बांधकाम जमीन पातळीच्या १० ते १२ मीटर खाली पोहोचलेले असेल. जास्तीतजास्त ठिकाणी डेकिंग व पायलिंगचे काम पूर्णदेखील होणार असल्याने मेट्रोच्या कामामुळे होणारा आवाज कमी होणार आहे, असे भिडे यांनी स्पष्ट केले. २०१६-१७मध्ये मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी मेट्रो कॉर्पोरेशनद्वारे करण्यात आलेल्या बेसलाइन सर्व्हेमध्ये निर्धारित ध्वनी मर्यादेत उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते, असेही त्या म्हणाल्या.
त्यामुळे विविध शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याबाबत ही चर्चा झाली. तसेच मेट्रो-३ सारखा जागतिक दर्जाचा शासकीय प्रकल्प राबविताना ध्वनिप्रदूषणावर प्रतिबंध लावण्यासाठी दर्जेदार तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर केला गेल्यास भविष्यात या पद्धती ‘एक रोल मॉडेल’ म्हणून शासकीय तसेच खासगी बांधकाम प्रकल्पांना लागू करण्यासही उपयुक्त ठरतील, असेही सांगण्यात आले.
सुमैरा अब्दुलाली यांनी आपण मेट्रो-३ प्रकल्पाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ध्वनी प्रतिबंध उपाययोजनांविषयी व ध्वनिप्रदूषणाची पातळी शक्य तेवढी खाली आणण्याकरिता आपण आग्रही आहोत. गृह (वाहतूक) विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी प्राधिकरणाला सर्व बांधकाम स्थळांवर ध्वनी प्रतिबंध उपाययोजना अवलंबविण्याच्या सूचना करत प्रकल्पावर काम करणाºया सर्व कंत्राटदार व कामगारांना ध्वनिप्रदूषणामुळे होणाºया दुष्परिणामाविषयी जागृती निर्माण करण्याचे निर्देश दिले.
प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच काही सूचना असल्यास कळविण्यासंदर्भात प्राधिकरणाने अब्दुलाली यांना विनंती केली.
मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर वाहतूककोंडीमुळे होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा बसणार असून, वायुप्रदूषणदेखील कमी होणार आहे. तेव्हा मुंबईकरांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.