मेट्रो ३ मार्गिकेवर गाडी अर्धा तास बंद; सकाळी प्रवाशांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 11:46 AM2024-10-10T11:46:16+5:302024-10-10T11:46:24+5:30
सोशल मीडियावर तीव्र नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी मार्गावर बुधवारी मेट्रो सेवा जवळपास अर्ध्या तासासाठी विस्कळीत झाली. मेट्रो ३ मार्गिकेवरील सहार स्थानकात गाडी अर्धा तास एकाच जागी थांबली होती. ऐन सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.
मुंबई मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा १२.६९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मात्र, मेट्रो गाडी सेवेत दाखल झाल्यापासूनच तिला तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. या मेट्रो मार्गिकेवरील गाडीत सोमवारी आणि मंगळवारीही तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रकार घडले होते.
मेट्रो गाडी एकाच जागी ४ ते ५ मिनिटे थांबल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. त्यातच आरे येथून बीकेसीकडे जाणारी मेट्रो गाडी बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जवळपास अर्धा तास बंद पडल्याचा प्रकार घडला.
सहार मेट्रो स्थानकात ही गाडी एकाच जागी जवळपास अर्धा तास उभी होती. त्यातून सकाळच्या सुमारास कार्यालयात निघालेल्या कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. याबाबत प्रवाशांनी समाज माध्यमाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली.
तांत्रिक दोषामुळे बसला फटका
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दर साडेसहा मिनिटांनी गाडी चालवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, बीकेसी स्थानकात बुधवारी प्रवाशांना गाडीसाठी तब्बल अर्धा तास वाट पाहावी लागली. त्यातूनही प्रवाशांनी नाराजीचा सूर आळवला. याबाबत एमएमआरसीकडे विचारणा केली असता, गाडीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता. हा दोष काही वेळाने दूर करण्यात आला, अशी माहिती एमएमआरसीने दिली. मात्र, हा बिघाड कशामुळे झाला होता, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.