Join us

मेट्रो-३ कामाने उडवली रहिवाशांची झोप !

By admin | Published: May 24, 2017 1:50 AM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले असून, विधानभवन आणि चर्चगेट परिसरात रात्री सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांची ‘झोप’ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे येथील मेट्रोच्या कामासाठी वृक्षतोडही हाती घेण्यात आली असून, या वृक्षतोडीला रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू झाले असून, नुकतेच वांद्रे-कुर्ला संकुल आणि धारावी येथील कामासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने या वृक्षतोड प्रकरणात मुंबई मेट्रोला दिलासा दिला आहे. मात्र सद्य:स्थितीत विधानभवन आणि चर्चगेट परिसरात रात्री करण्यात येत असलेल्या कामांमुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवसा काम करणे ठीक; परंतु रात्री दहानंतर कंत्राटदाराकडून होत असलेल्या कामांचा त्रास होत असल्याचे रहिवासी शालिनी, अश्विन नागपाल आणि वॉचडॉगचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. मेट्रोच्या कामासाठी मोठमोठी यंत्रे वापरली जात असून, त्याच्या आवाजाने परिसरातील ध्वनिप्रदूषण वाढत आहे. या प्रकरणी कंत्राटदाराची तक्रार करूनही काहीच कारवाई होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ८ वाजेदरम्यान होणारे काम थांबविण्यात यावे, अशी रहिवाशांची मागणी आहे.