मुंबई : अमानवी पद्धतीने प्रवास न करता थोडा आरामदायी प्रवास व्हावा, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी, पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी व जनहिताकरिता थोडा त्रास सहन करावा लागेल, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने, शुक्रवारी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे मेट्रो-३चे काम रात्रीच्या वेळी करण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(एमएमआरसीएल) परवानगी दिली.मेट्रो रेल प्रकल्प लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, याबाबत वाद नाही. त्यासाठी २६,१३६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चांगल्या वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे, याकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत कठोर निर्णय घेऊ शकत नाही. या प्रकल्पामुळे सामान्यांना होणाऱ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकल्पासाठी सहकार्य करण्यात आले नाही, तर सरकारी तिजोरीला दरदिवशी ४.५ कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण सहन करावा लागेल, असे प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.कुलाबा येथील रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी मेट्रोच्या कामादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करता येत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रोजेक्टचे कामकाज सुरू असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रकची ये-जा सुरू असते व यंत्रांचाही आवाज येत असतो. त्यामुळे येथील लोकांना झोप मिळत नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केला.न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी कुलाबा येथे रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान मेट्रोचे काम करण्यास स्थगिती दिली. ही स्थगिती हटविण्यात यावी, यासाठी एमएमआरसीएलने उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणीत न्यायालयाने नीरीला कुलाबा येथील आवाजाच्या पातळीचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यास सांगितले, तसेच शिफारशीही करण्यास सांगितले.त्यानुसार, नीरीने मेट्रोच्या कामादरम्यान येथील आवाजाची पातळी वाढत असल्याचे न्यायालयाला सांगितले. आवाजाची पातळी मर्यादित ठेवण्यासाठी कामाच्या ठिकाणी ध्वनिरोधक लावण्याची व सहसा दिवसाच मोठमोठ्या यंत्रांचा वापर करण्याची शिफारस केली. त्याचप्रमाणे, आणखी काही सूचनाही केल्या.नीरीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करा, असा आदेश देत, हायकोर्टाने एमएमएआरसीएलला दिलासा दिला. याशिवाय, तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचे व हेल्पलाइन नंबर सुरू करण्याचे निर्देश एमएमआरसीएलला दिले.रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत काम सुरूलोकलमधील गर्दीमुळे दरदिवशी नऊ लोकांचा मृत्यू होतो. अमानवी पद्धतीने प्रवास करण्याऐवजी थोडा आरामदायी प्रवास करावा, अशी लोकांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. अस्तित्वात असलेल्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करावा, असा हेतू पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारण्यामागे असेल, तर त्याचा थोडा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे एमएमआरसीएल आणि लार्झन अँड टुब्रो (एल अँड टी) जर नीरीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार असतील, तर या प्रोजेक्टमध्ये तांत्रिक कारणास्तव अडथळा निर्माण करण्याची आवश्यकता नाही.एमएमआरसीएल व एल अँड टी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करतील, असे म्हणत न्यायालयाने दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मेट्रोचे काम करण्यास दिलेली स्थगिती हटविली.
मेट्रो-३चे काम आता रात्रीही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:37 AM