Join us  

मेट्रो-३चा डेपो आरेमध्येच

By admin | Published: March 11, 2016 3:01 AM

मेट्रो-३च्या डेपोवरून गेल्या काही महिन्यांपासून वाद रंगलेला असताना आता हाच डेपो आरे कॉलनीतच होणार असल्याचे निश्चित झाले आहे

मुंबई : मेट्रो-३च्या डेपोवरून गेल्या काही महिन्यांपासून वाद रंगलेला असताना आता हाच डेपो आरे कॉलनीतच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आरेतील डेपोला पर्याय म्हणूनच कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय निवडण्यात आला होता. यावर तीन महिन्यांत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र काहीच निर्णय न झाल्याने आरे कॉलनीतील जागेसाठी मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहे. मेट्रो-३ चा डेपो आरेमध्ये होणार असल्याने जवळपास २ हजार २९८ झाडे तोडण्यात येणार होती. त्याला पर्यावरणवादी आणि काही राजकीय पक्षांकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे यावरील निर्णय एक वर्षापेक्षा जास्त रखडला. या जागेला पर्याय म्हणून कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय समोर ठेवण्यात आला. परंतु कांजूरमार्ग येथील जागा दलदलीची असल्याने डेपो उभारणीसाठी बराच कालावधी लागेल, असा अंदाज बांधण्यात आला आणि त्यामुळे प्रकल्प रखडण्याची चिन्हे होती. तसेच कांजूरमार्गपर्यंत वेगळा मार्गही उभारावा लागणार होता. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी कांजूरमार्ग डेपोची जागा जोगेश्वरी ते कांजूरमार्ग या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. आरे कॉलनीतच मेट्रो-३ च्या डेपो उभारणीच्या प्रस्तावाला मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाच्या सभेत मंजुरी देण्यात आली असून आता प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.