मुंबई : संपूर्णत: भुयारी असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या वायुविजन, स्थानकांचे वातानुकूलन व पर्यावरण नियंत्रण प्रणालीविषयक कामांकरिता पात्र निविदाकारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आयोजित पूर्व अर्हता बैठकीमध्ये ब्लू स्टार अॅण्ड सी डॉक्टर समूह, ईटीए इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, आयसॉलक्स इन्गनिरिया एसए, स्टर्लिंग व विल्सन जी.वाय.टी. समूह व वॉल्टाज एस.टी.ई.सी. समूहाने हजेरी लावली. भुयारी मेट्रोमध्ये वायुविजन व वातानुकूलन प्रणाली महत्त्वाची भूमिका पार पाडते. वायुविजन व वातानुकूलन प्रणालीविषयक असलेल्या तांत्रिक व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेविषयी अधिक माहिती देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वायुविजन प्रणाली, स्थानकांच्या वातानुकूलन यंत्रणेची देखभाल आणि यंत्रणांचे एकत्रीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, भविष्यात मेट्रो-३ मुळे प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. दरम्यान, झाडे तोडण्यावरून या प्रकल्पासमोरील आव्हाने वाढली आहेत़ (प्रतिनिधी)
मेट्रो-३ च्या कामाला भरघोस प्रतिसाद
By admin | Published: March 19, 2017 3:32 AM