मेट्रो ३ चे काम वेगाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:06 AM2018-10-30T01:06:22+5:302018-10-30T01:07:11+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानचा मुंबई मेट्रो ३ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) जोमाने कामाला लागली आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानचा मुंबईमेट्रो ३ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) जोमाने कामाला लागली आहे. संपूर्णपणे भुयारी मार्ग असलेल्या या प्रकल्पाच्या १४ मेट्रो स्थानकांच्या जायका कंपनीकडून कायदेशीर पडताळणीनंतर लिफ्ट (एस्केलेटर) कार्यप्रणालीचा महत्त्वपूर्ण करार एमएमआरसीएलकडून नुकताच करण्यात आला. या करारामुळे मेट्रो ३ च्या स्थानकांच्या कामांना गती येणार असून यामुळे नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीएलचा मानस आहे.
मेट्रो ३ प्रकल्पाच्या १४ मेट्रो स्थानकांच्या (सिद्धिविनायक ते कफ परेड मेट्रो स्थानक) ‘युआंडा - रॉयल कन्सोर्टियम’, ‘चायना कन्सोर्टियम’ यांच्यासह हा करार झाला असून त्यांच्यामार्फतच लिफ्टबांधणी केली जाईल. कराराअंतर्गत एकूण १४ स्थानकांच्या लिफ्टचे डिझाइन, निर्मिती, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसह इतर संबंधित ८६ प्रकारची कामे केली जातील. याशिवाय ऊर्जाबचतीला प्राधान्य देऊन रियल टाइम मॉनिटरेटिंग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लिफ्टचे काम केले जाईल.
एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या कराराविषयी बोलताना सांगितले की, मेट्रो ३ च्या भुयारी प्रवासात लिफ्ट्स (एस्केलेटर) ही प्रवाशांच्या आरामदायक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो ३ साठी मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत लिफ्ट्स प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा आमचा उद्देश आहे.