मेट्रो तीनचे काम ‘चौपट’, खर्च वाढणार, डेडलाइन हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:22 AM2020-09-04T06:22:24+5:302020-09-04T06:22:53+5:30

कांजूरमार्ग, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथील तीन जागांसह अन्य पर्यायी जागांची चाचपणी पुन्हा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Metro 3's work will be in problem, costs will increase, deadlines will be missed | मेट्रो तीनचे काम ‘चौपट’, खर्च वाढणार, डेडलाइन हुकणार

मेट्रो तीनचे काम ‘चौपट’, खर्च वाढणार, डेडलाइन हुकणार

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो तीन प्रकल्पासाठी आरे कॉलनी येथील कारशेडवर सरकारने फुल्ली मारली असली तरी नव्या कारशेडवर मात्र अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. कांजूरमार्ग, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथील तीन जागांसह अन्य पर्यायी जागांची चाचपणी पुन्हा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

गोरेगावच्या गोल्डन पाम येथील खासगी विकासकाची जागा ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्सच्या (टीडीआर) मोबदल्यात कारशेडसाठी निवडली जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आरे कॉलनी येथील कारशेड रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनेसाठी हा संवेदनशील विषय असल्याने कारशेडच्या पर्यायी जागेबाबत एमएमआरसीएल आणि नगरविकास विभागातले अधिकारी अधिकृतरीत्या बोलण्यास तयार नाहीत. पर्यायी जागांबाबतचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल, अशी उत्तरे दिली जात आहेत. २०१५ साली सखोल अभ्यासाअंती कारशेडसाठी आरे कॉलनी येथील जागाच संयुक्तिक असल्याचा निर्णय झाला होता. तर, डिसेंबर २०१९ मध्ये आयएएस अधिकारी मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने व्यवहार्य ठरेल अशी जागा उपलब्ध नसल्याचे मत नोंदविले होते. त्यानंतर आता पुन्हा पर्यायी जागांसाठी चाचपणी सुरू झाली आहे.

कांजूरमार्ग येथील जागा या मेट्रो मार्गिकेपासून ७ किमी लांब असल्याने तेवढ्या लांब अनावश्यक फेऱ्या (डेड रन) माराव्या लागतील. त्यामुळे खर्च वाढेल आणि तो भार वाढीव तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांवर पडेल. प्रति किमी ०.९ एकर यानुसार कारशेडसाठी २७ एकर जागा येथे उपलब्ध नाही. त्याशिवाय मेट्रो सहा आणि तीन या मार्गिका संलग्न कराव्या लागणार असल्याने खर्चासह प्रवासी फेऱ्यांवरही परिणाम होईल. जोगेश्वरी येथील १०२ एकरचा भूखंड एसआरपीएफच्या ताब्यात आहे. मात्र, तोसुद्धा सीप्झ या शेवटच्या मेट्रो स्थानकापासून ६ किमी लांब आहे. त्यामुळे गोरेगाव येथील फिल्मसिटीलगतच्या खासगी विकासकाची जागा या कारशेडसाठी निवडली जाण्याची दाट शक्यता आहे. ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स (टीडीआर)च्या मोबदल्यात ही जागा संपादित केल्याने सरकारवर अतिरिक्त भार पडणार नाही, असे सांगितले जात आहे. परंतु, तो निर्णय घेताना खासगी विकासकाची तळी सरकारने उचलून धरली, अशी टीका होण्याची शक्यता असल्याने सावध भूमिका घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

४५० कोटींचा खर्च पाण्यात
आरे येथील मेट्रो कारशेडसाठी केलेला सुमारे ४५० कोटींचा खर्च जवळपास पाण्यात गेला आहे. शिवाय काम जवळपास १० महिने बंद असल्याने प्रकल्पाचा खर्च २३ हजार १३६ कोटींवरून ३२ हजार कोटींवर गेल्याचे सांगितले जाते. नव्या कारशेडमुळे त्यात आणखी वाढ होणार हे निश्चित आहे.
 

Web Title: Metro 3's work will be in problem, costs will increase, deadlines will be missed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.