मुंबई : अंधेरी येथील सीआरझेड- १ मध्ये येणारे स्वामी समर्थ नगर येथून मेट्रो - ६ च्या मार्गिकेचे काम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) शुक्रवारी परवानगी दिली. स्वामी समर्थ नगर येथे मेट्रो - ६च्या मार्गिकेचे जे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे खारफुटीचे नुकसान होणार नाही. २६ खांब जे सीआरझेड-१मध्ये येणार आहेत, ते आधीच अस्तित्वात असलेल्या बीक रोडच्या मध्यावर बांधण्यात येणार आहेत, असे एमएमआरडीएने न्यायालयाला सांगितले.एमएमआरडीएला या कामाकरिता परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात येण्यास भाग पाडण्यात आले. कारण महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथोरिटीने एमएमआरडीएला या कामासाठी उच्च न्यायालयाकडून परवानगी घेण्याची अट घातली. स्वामी समर्थ नगर भागातील ५० मीटर बफर झोनमधील खारफुटीवर या कामाचा परिणाम होईल म्हणून या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले नाही, असे एमएमआरडीएच्या वकिलांनी न्यायलयाला सांगितले.बॉम्बे इनव्हॉरमेंटल अॅक्शन ग्रुप या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आॅक्टोबर २००५ मध्ये उच्च न्यायालयाने अनेक निर्देश दिलेहोते. न्यायालयाने खारफुटी असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यास मनाई केली. तसेच विकासकामांसाठी खारफुटी तोडायची असल्यास उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले.दरम्यान, २३.६ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिका २ बी डी. एन. नगर, अंधेरी ते मंडाले या पूर्व उपनगरांना जोडते तर १४. ५ किलोमीटर लांबीची मेट्रो -६ मार्गिका स्वामी समर्थ नगर, अंधेरी ते विक्रोळी या दोन ठिकाणांना जोडते. एमएमआरडीएने मेट्रो -२ बी च्या तुर्भे व मंडाले या ठिकाणी ५० मीटरची संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. कारण प्रस्तावित बांधकामाचा काही भाग सीआरझेडमध्ये येतआहे.>न्या. आर. डी. धानुका व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला मेट्रो २ बी मार्गिकेवरील तुर्भे आणि मंडाले येथे ५० मीटर संरक्षक भिंत घालण्याची परवानगी दिली. दोन्ही प्रकल्प ३१० कि.मी. लांबीच्या मेट्रो जाळ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे म्हणत न्यायालयाने एमएमआरडीएला मेट्रो-६ व मेट्रो-२बी मार्गिकवर बांधकाम करण्यास परवानगी दिली.
मेट्रो -६ च्या मार्गिकेचे काम होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:06 AM