मेट्रो-७ प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण होणार
By Admin | Published: August 9, 2016 02:54 AM2016-08-09T02:54:43+5:302016-08-09T02:54:43+5:30
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व हा मेट्रो ७ प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी व्यक्त केला
मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व हा मेट्रो ७ प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी व्यक्त केला. मेट्रो ७ या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व २४७ (रहिवासी आणि व्यावसायिक) कुटुंबांचे एमयूटीपी धोरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येईल, असेही दराडे यांनी सांगितले. मेट्रो-७ या प्रकल्पाच्या बॅरिकेडिंगच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दराडे बोलत होते. या वेळी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे हेदेखील उपस्थित होते.
प्रवीण दराडे यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बॅरिकेडिंगचे काम करण्यात येत आहे. महापालिकेकडून सर्व भूमिगत सेवावाहिन्यांचे नकाशे प्राधिकरणाकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. या सर्व भूमिगत सेवावाहिन्या अधोरेखित करून खोदकामाला सुरुवात करण्यात येईल. वाहनचालकांना असुविधा होणार नाही; याची खात्री करूनच बॅरिकेडिंगचे काम करण्यात येईल. प्रथमत: तीन ठिकाणी एक किलोमीटरवर काम हाती घेतले जाईल.
कामाच्या वेळा प्रत्यक्ष स्थिती पाहून मागेपुढे केल्या जातील. प्रकल्पाचे काम दोन पाळ्यांत केले जाईल. गर्डर टाकण्याचे काम केवळ रात्रीच केले जाईल. गर्दीच्या वेळी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध करून देण्यात येतील. बॅरिकेडिंग आणि खोदकाम करताना सेवा रस्त्यांचा उपयोग केला जाणार आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. सेवा रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही आणि बॅरिकेडिंगबाहेर कोणतेही काम केले जाणार नाही.
प्रत्यक्ष वाहतुकीच्या मार्गात बदल केले जाणार नाहीत. वाहतूक सुरळीत राहण्यासह प्राधिकरण आणि वाहतूक विभागाकडून प्रशिक्षित अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यात येईल. बांधकामावेळी बेस्टतर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येतील. दहिसर टोल नाक्यावरील टोल बूथ ५०० मीटर अथवा आवश्यक तेवढ्या मीटर अंतराने मागेपुढे नेण्यात येतील. त्यामुळे वाहतूककोंडी होणार नाही, असेही दराडे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
मार्गाची एकूण लांबी : १६.४७५ किलोमीटर
डेपो : दहिसर
स्थानकांची संख्या : १४
स्थानके : अंधेरी, शंकरवाडी, जेव्हीएलआर, महानंद, आरे, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मागाठणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा, दहिसर
प्रवासी वाहून नेण्याची क्षमता : २०२१ साली दररोज ५.२९ लाख आणि २०३१ साली दररोज ६.६७ लाख