Join us  

मेट्रो-७ चा पहिला यू-गर्डर

By admin | Published: May 04, 2017 6:29 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम द्रुतगती मार्गावरील पठाणवाडी, मालाड येथील मेट्रो- ७ मार्गावरील पहिल्या यू-गर्डरचे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम द्रुतगती मार्गावरील पठाणवाडी, मालाड येथील मेट्रो- ७ मार्गावरील पहिल्या यू-गर्डरचे पहाटे २ वाजता अनावरण केले. या मेट्रोचा मार्ग दहिसर (पू) ते अंधेरी (पू) असा असणार आहे. १४० टन वजन, २५ मीटर लांबी आणि ५ मीटर रुंदी असलेल्या या गर्डरमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय टळणार आहे. दिवसा अनावरण केले असते, तर आधीच वाहतुकीची मोठी समस्या असलेल्या या भागात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूककोंडी वाढली असती. हे टाळण्यासाठी मध्यरात्रीनंतर अनावरण करण्याची शक्कल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लढवली. परिसरातील नागरिकांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या या युक्तीला दाद दिली आहे. मेट्रो मार्ग मुंबईची गरज बनली आहे. ती पूर्ण करण्यासाठी मुंबईकरांच्या सोयीसाठी अपण प्रत्येक पाऊल उचलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अनावरण प्रसंगी सांगितले. मेट्रो- ७ मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्गावरून जात असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक निश्चितच कमी होणार आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी २०१९ ही मेट्रो-७ या प्रकल्पाची डेडलाइन असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले. रात्री दोन वाजता केलेल्या या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी वांद्रे (प), येथील मेट्रो कास्टिंग यार्ड, डी. एन. नगर, ते दहिसर (प), मेट्रो मार्ग - २ (अ), तसेच दहिसर (पू) ते अंधेरी (पू) मेट्रो मार्ग-७ या मेट्रो मार्गांना भेटी दिल्या.प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान या प्रसंगी म्हणाले, ‘दहिसर (पू) ते अंधेरी (पू) मेट्रो मार्ग - ७ आणि डी.एन.नगर ते दहिसर (प) मेट्रो मार्ग २ अ हे एकमेकांना पूरक आहेत. त्याद्वारे तब्बल ९ लाख प्रवासी प्रवास करणार आहेत. या मार्गांमुळे उपनगरीय रेल्वेमधील गर्दीसुद्धा कमी होणार असून, प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे.’ (प्रतिनिधी)